पुणे-: राज्य उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केलेल्या आदेशानुसार, पुण्यातील विश्रामबाग, फरासखाना आणि खडक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत येणारी दारूची दुकाने, परमिट रूम, बीअर बार आणि रेस्टॉरंट्स गणेशोत्सव काळात बंद ठेवण्यात येणार आहेत. या भागांत गणेश मंडळांची संख्या लक्षणीय असल्याने आणि मोठी गर्दी अपेक्षित असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वी अशी बंदी केवळ पहिल्या आणि शेवटच्या दिवशी लागू होत असे, मात्र यंदा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी संपूर्ण उत्सवासाठी ‘ड्राय डे’ लागू करण्याची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.
दरम्यान, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी गणेशोत्सव काळात लाऊडस्पीकरच्या वापराला मध्यरात्रीपर्यंत परवानगी देण्याचा आदेश जारी केला आहे. ही परवानगी ३० ऑगस्ट ते ४ सप्टेंबर आणि ६ सप्टेंबर (विसर्जन) या दिवसांसाठी लागू असेल. म्हणजेच, एकूण सात दिवसांची विशेष सूट देण्यात आली आहे.
सहसा लाऊडस्पीकरला पाच दिवसांसाठी रात्री बारा वाजेपर्यंतची मुभा मिळते, मात्र यंदा उत्सवाचे चौथे आणि पाचवे दिवस शनिवार-रविवारी येत असल्यामुळे आणि त्या दिवशी गर्दीचा मोठा अंदाज असल्यामुळे ही मुदत वाढवण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्याने आणि नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही पुण्यात आढावा घेत असताना या निर्णयाची घोषणा केली होती.

