पुणे : सुश्राव्य आणि सहज फिरत असलेला आवाज, दमदार ताना, बहारदार सादरीकरण यातून रंगली किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक पंडित डॉ. संजय गरुड यांची मैफल.
निमित्त होते डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन संचलित स्वरमयी गुरुकुलतर्फे आयोजित मासिक स्वरमयी बैठकीचे. मैफल आज (दि. 24 ऑगस्ट) स्वरमयी गुरुकुल सभागृह, संभाजी उद्यानासमोर येथे झाली.
पंडित डॉ. संजय गरुड यांनी आपल्या मैफलीची सुरुवात मिया की तोडी रागातील ‘बैय्या भर न देत गगरिया’ या पारंपरिक बंदिशीने केली. याला जोडून द्रुत तालातील ‘लंगर कांकरिया जी ना मारो’ ही सुप्रसिद्ध रचना सादर केली. या नंतर खमाजमधील ‘अब कैसे घर जाऊ कन्हैया’ ही रचना ऐकविताना पंडित गरुड यांनी रसिकांसमोर कृष्णलिलेचे अवर्णनिय रूप साकार केले. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज रचित ‘आता कोठे धावे मन’ ही भक्तीरचना सादर करून रसिकांना भक्तीरसाचा अद्भुत आनंद दिला. ‘बाजे रे मुरलिया बाजे’ हे सुप्रसिद्ध कृष्णभजन ऐकवून पंडित गरुड यांनी कृष्ण आणि त्याच्या वेणूच्या अद्वैताचे रूप दर्शविले. मैफलीची सांगता ‘जो भजे हरि को सदा’ या लोकप्रिय भैरवीने केली.
स्वरसावलीच्या वास्तूत सादर झालेली ही मैफल रसिकांना अवर्णनीय आनंद देऊन गेली. रोहन पंढरपूरकर (तबला), माऊली फाटक (पखवाज), तुषार केळकर (संवादिनी), प्रसाद कुलकर्णी, गणेश ढाकोळे (सहगायन) यांनी साथसंगत करत मैफलीत बहार आणली.
डॉ. अश्विनी वळसंगकर यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. डॉ. संजय गरुड यांच्या गुरुमाता शीला देशपांडे यांनी कलाकारांना आशीर्वादरूपी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे निवेदन वर्षा किराड यांनी केले.
स्वरमयी बैठकीत पंडित संजय गरुड यांचे सुश्राव्य गायन
Date:

