निमित्त पद्मश्री जयमाला शिलेदार यांच्या जन्मशताब्दी वर्ष
पुणे : पुण्याचे सांस्कृतिक वैभव असलेले बालगंधर्व रंगमंदिर, वेळ सकाळी नऊची, रंगमंदिराच्या आवारातील लक्ष वेधून घेणारी आकर्षक रांगोळी, रसिकांच्या चेहऱ्यावर दिसणारी उत्कंठा, तिसरी घंटा होते, भरजरी वस्त्रातील कलाकार आणि रसिकांमधील मखमली पडदा दूर होतो, 56 नाट्यपदे, टाळ्या, वन्स मोअरची दाद देत पाच तास रंगलेला चार अंकी नाट्यप्रयोग.. होय आज हे घडलयं.. संगीत सौभद्र या संगीत नाटकाच्या प्रयोगानिमित्ताने…
मराठी रंगभूमी, पुणे आणि गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री जयमाला शिलेदार यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आज (दि. 24) अण्णासाहेब किर्लोस्कर लिखित संगीत सौभद्र या नाटकाचा दीर्घ प्रयोग आयोजित करण्यात आला होता.
‘प्रिये पहा’, ‘लग्नाला जातो मी’, ‘राधाधर मधुमिलिंद जय जय’, ‘नच सुंदरी करू कोपा’, ‘पावना वामना या मना’, ‘बलसागर तुम्ही वीरशिरोमणी’, ‘पांडु नृपती जनक जया’, ‘पार्था तुज देऊन वचन’, ‘बहुत दिन नच भेटलो’, ‘लाल शालजोडी जरतारी’ अशा गाजलेल्या अनेक नाट्यपदांसह सहसा प्रयोगात घेतली न जाणारी ‘वसंती बघुनी मेनकेला’, ‘अति कोपयुक्त’, ‘तुज देऊनी वचने’, ‘माझ्यासाठी तिने’, ‘व्यर्थ मी जन्मले’, ‘पुष्पपराग सुगंधीत’ ही पदे देखील रसिकांना आज ऐकावयास मिळाली. या प्रयोगाचे वैशिष्ट्य म्हणजे संगीत नाटक सादरीकरणादरम्यान जो सध्या होत नाही असा नटीसूत्रधाराचा प्रवेशही या नाट्यप्रयोगात सुरुवातीस सादर झाला तसेच नाटकाची सांगता भरतवाक्याने झाली. या प्रयोगात रुक्मिणी आणि सुभद्रा प्रवेश हा देखील अनेक वर्षांनी सादर केला गेला.
पुणे शहरासह महाराष्ट्रातील अनेक संगीत नाटकप्रेमी रसिकांनी या दीर्घ प्रयोगास आवर्जून उपस्थिती लावली तर रसिकांमधील अनेक ज्येष्ठांनी जयमालाबाई शिलेदार यांनी सादर केलेला संगीत सौभद्रचा रंगलेला प्रयोग पाहिला होता. त्यातील एका रसिक महिलेने प्रयोग संपल्यानंतर रंगमंचावर येत भावनेने ओथंबलेल्या शब्दांनी आठवणींना उजाळा देत नव्या संचातील प्रयोगाचे कौतुक केले.
निनाद जाधव, चिन्मयजोगळेकर, भक्ती पागे, ज्ञानेश पेंढारकर, डॉ. धनश्री खरवंडीकर, ओंकार खाडिलकर, सुदीप सबनीस, वैभवी जोगळेकर, डॉ. ऋतुपर्ण पिंगळे, निरंजन कुलकर्णी, अनुपमा कुलकर्णी, अवंती बायस, सयाजी शेंडकर, चिन्मय पाटसकर, रमा जोगळेकर, राकेश घोलप, संतोष गायकवाड यांनी भूमिका साकारल्या. तर लीलाधर चक्रदेव (ऑर्गन), प्रमोद जांभेकर (व्हायोलिन), अभिजित जायदे (तबला) यांची समर्पक साथसंगत लाभली. दीप्ती शिलेदार-भोगले यांचे दिग्दर्शन होते तर वर्षा जोगळेकर यांनी संयोजन केले.
लोकमान्य मल्टिपर्पजचे शाखा व्यवस्थापक श्रीकांत देशपांडे, सुरेश रानडे, जयश्री रानडे, दीप्ती शिलेदार-भोगले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन नाट्यप्रयोगाचा शुभारंभ झाला.
संगीत सौभद्र.. पाच तास.. 56 नाट्यपदे.. टाळ्या अन् वन्समोअर
Date:

