पुणे : आज कोणत्याही गोष्टीवरून वाद होताना दिसत आहेत. याचे मूळ कारण म्हणजे इतिहासाचे भान सामान्य माणसाच्या पातळीवर निर्माण झालेले नाही. बाळशास्त्री जांभेकरांपासून डॉ. आंबेडकरांपर्यंत सगळ्या सुधारकांनी सत्य आणि नीतिमत्तेवर भर दिला. मात्र, आज इतिहास साक्षरता आणि सार्वजानिक नीतिमत्तेपासून आपण दुरावलो आहोत, असे मत महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी व्यक्त केले.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, पुणे प्रार्थना समाज आणि डॉ. अशोक पद्मनाभ भांडारकर यांचे कुटुंबीय यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. रा.गो.भांडारकर स्मृतिशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन भांडारकर संस्थेच्या श्री नवलमल फिरोदिया सभागृहात करण्यात आले होते. यावेळी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक, येथील माजी कुलगुरु डॉ. उमा वैद्य, भांडारकर संस्थेचे कार्याध्यक्ष श्री .भूपाल पटवर्धन, पुणे प्रार्थना समाजाच्या अध्यक्ष डॉ. सुषमा जोग, सेक्रेटरी डॉ.दिलीप जोग, सहचिटणीस श्रीमती नमिता मुजुमदार आदी उपस्थित होते. डॉ. रा.गो.भांडारकर – जीवन आणि कार्य या विषयावर डॉ. उमा वैद्य यांनी विचार मांडले.
प्रमुख पाहुणे डॉ. राजा दीक्षित म्हणाले, इतिहासाचे परिपक्व भान निर्माण झाले, तर सगळ्या सामाजिक समस्या दूर होतील. सध्याच्या काळात धर्माची परिस्थिती इतकी दारूण झाली आहे की त्याच्याइतकी अधार्मिक गोष्ट दुसरी नसेल. खऱ्या धर्माची जाणीव निर्माण करणे ही आजची गरज असून भांडारकरांच्या जीवनातून हे आपण शिकायला हवे. मराठीच्या इतिहासात रानडे आणि भांडारकर हा समास आहे, ही नावे नेहमी जोडून येतात. प्रार्थना समाजाच्या तत्त्वज्ञानाला दोघांनी आकार दिला. तसेच भारतीय समाजाला संस्थात्मकता देण्यात त्यांचे योगदान होते.
डॉ. उमा वैद्य म्हणाल्या, डॉ. भांडारकर यांनी संस्कृत भाषा, प्राच्यविद्या, धर्मसुधारणा आणि समाजसुधारणा असे चौपदरी कार्य केले. ज्या काळात भारतावर पाश्चात्य संस्कृतीचा परिणाम होऊ लागला होता त्या संक्रमणाच्या काळात देशाला प्रगतीपथावर नेण्याचे काम ज्या समाजसुधारकांनी केले, त्यांपैकी सर भांडारकर हे अग्रेसर होते. शिक्षणतज्ज्ञ, प्राच्यविद्या विशारद, समाज सुधारक आणि धर्म सुधारक ही त्यांची ओळख होती. प्राचीन भारतीय इतिहासाचे पुर्नलेखन करण्यात ते अग्रभागी होते. भांडारकर संस्था व प्रार्थना समाज ह्या संस्था म्हणजे त्यांच्या कामाचे जिवंत प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. रा.गो.भांडारकर यांच्याविषयी आधुनिक कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाने साकारण्यात आलेली चित्रफीत भांडारकर संस्थेतर्फे दाखविण्यात आली. तसेच पुणे प्रार्थना समाजाच्या वतीने डॉ. भांडारकरांनी रचलेली पदे व त्यांनी संतरचनांवर केलेले निरूपण समाविष्ट करून विशेष सांगीतिक कार्यक्रम सादर झाला. यात डॉ . दिलीप जोग व डॉ. सुषमा जोग यांनी निरूपण केले तर धनश्री घाटे, धनश्री गणात्रा, सानिका सोमण व प्रणव कुलकर्णी यांनी गायन केले, तसेच अंजली राव, नीलेश कुलकर्णी, शशिकांत भोसले व नमिता मुजुमदार यांनी वाद्यसाथ केली. भांडारकर संस्थचे निबंधक डॉ. श्रीनंद बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दिलीप जोग यांनी आभार मानले.

