पुणे-अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील सुपा औद्याेगिक वसाहतीतील “जपानी इंडस्ट्रीज पार्क’ मध्ये “कार्ल्सबर्ग’ हा मद्य निर्मितीचा उद्याेग ५०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. ३२ एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पातून ५०० जणांना राेजगार उपलब्ध हाेईल. त्यासाठी या उद्याेग समूहाकडून जागेचा आलेला प्रस्ताव हा मुंबई येथील औद्याेगिक विकास महामंडळाच्या मुख्यालयात पाठवण्यात आला. दरम्यान, गेल्या ७ महिन्यात या औद्याेगिक वसाहतीत २ हजार १३५ काेटींची गुंतवणूक या औद्याेगिक वसाहतीत झाली आहे.
सुपा औद्याेगिक वसाहतीत ५ नाेव्हेंबर २०१८ ला चीनच्या कॅरियर मायडिया या होम अप्लायन्सेसच्या पहिल्या उद्याेग समूहाच्या कामाचे भुमिपूजन झाले हाेते. गेल्या ८ वर्षांत या वसाहतीत आंतराष्ट्रीय स्तरावरील चीन, जपान या देशांसह भारतातील माेठ्या उद्याेगांनी ३३ उद्याेगांनी गुंतवणूक केली. गेल्या ७ महिन्यात सुपा औद्याेगिक वसाहतीत २ हजार १३५ काेटींची गुंतवणूक झाली. यामध्ये श्रीलंकेचा किक्रेटर मुथ्यया मुरलीधरनच्या “सिलॉन ब्रव्हरेजेस’ या उद्याेगाने १ हजार ६४५ काेटींची गुंतवणूक केली. तर पश्चिम बंगाल राज्यातील काेलकत्ता येथील एसपीएमएल इन्फ्रा या उद्याेगाने ५०० काेटींची गुंतवणूक केली. त्यानंतर आता “कार्ल्सबर्ग’ हा बिअर निर्मितीचा उद्योग सुरू होणार आहे. “कार्ल्सबर्ग’कडून छत्रपती संभाजीनगर येथील औद्याेगिक वसाहतीतदेखील बिअर निर्मिती होते. आता अहिल्यानगर जिल्ह्यात हा प्रकल्प येत असल्याने स्थानिक तरुणांना रोजगार मिळणार आहे. यामुळे अर्थिक उलाढालही होणार आहे.
“कार्ल्सबर्ग’कडून सुपा औद्याेगिक वसाहतीत ३२ एकर जागेच्या मागणीचा प्रस्ताव आला. ५०० काेटींची गुंतवणूक हा उद्याेग समूह करणार आहे. त्यातून ५०० जणांना राेजगार मिळणार आहे. जागेच्या मागणीचा प्रस्ताव आल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी तो मुंबई येथील औद्याेगिक विकास महामंडळाच्या मुख्यालयाकडे सादर करण्यात आला. लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळू शकते. त्यानंतर जागेबाबत निर्णय घेतला जाईल. – गणेश राठाेड, प्रादेशिक अधिकारी
अहिल्यानगरसह पुणे जिल्ह्यातील चाकण, शिक्रापूर, रांजनगाव या औद्याेगिक वसाहतीत उद्याेगांसाठी जागा उपलब्ध हाेत नसल्याने तेथील उद्याेगांनी सुपा औद्याेगिक वसाहतीचा पर्याय निवडला आहे. त्याचबराेबर छत्रपती संभाजीनगर औद्याेगिक वसाहतीत जागेचा प्रश्न आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर-पुणे या महामार्गावरच सुपा औद्याेगिक वसाहत असल्यामुळे तेथील उद्याेगांसाठी सुप्यातील “जपानी इंडस्ट्रीज पार्क ठरणार सुवर्णमध्य ठरणार आहे. आगामी काळात या एमआयडीसीमध्ये अनेक मोठे प्रकल्प येण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते.

