बिहारच्या नरापराधाने केली अमानुष हत्या
मुंबई-मुंबई-कुशीनगर एक्स्प्रेसच्या एसी कोचच्या शौचालयातील कचऱ्याच्या डब्यात ७ वर्षीय मुलाचा मृतदेह आढळला आहे. कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) स्थानकावर शनिवारी ही घटना उघडकीस आली. आरोपीने मुलाची गळा दाबून हत्या केली आणि नंतर त्याचा मृतदेह कचरापेटीत टाकून पळ काढला. या प्रकरणी बिहारच्या २६ वर्षीय विकास साहा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून मृत मुलाचा नात्याने मावस भाऊ असल्याचेही समाेर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत आकाश साहा हा गुजरातमधील सुरतच्या अमरेली येथून बेपत्ता झाला होता. त्याचे अपहरण झाल्याची तक्रार अमरेली पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. त्याचे अपहरण केल्याचा संशय विकास याच्यावर होता. त्यामुळे अमरेली पोलिस विकासच्या मोबाइल लोकेशनचा मागोवा घेत होते. त्याचे शेवटचे लोकेशन मुंबईत आढळले. विकास साहा दोन आठवड्यांपूर्वीच बिहारहून कामाच्या निमित्ताने सुरत येथे आला होता. पीडित मुलाची आई घरात एकटीच राहत होती. तिने विकासला तिच्या घरी येण्यास मनाई केल्यामुळे तो नाराज होता. मात्र, अद्याप याची पुष्टी झाली नाही.
आकाशची त्याचा मावस भाऊ विकाससोबत खूप गट्टी जमली होती. त्यामुळेच तो त्याच्यासोबत सुरतहून मुंबईला आला. त्याला हे माहीत नव्हते की त्याचा मावस भाऊच त्याचा मारेकरी ठरणार आहे. सुरतहून रेल्वने विकास मुंबईतील दादर स्थानकावर उतरला. त्यानंतर लोकल ट्रेनने तो एलटीटीला पोहोचला. एलटीटी स्थानकावर त्याने कुशीनगर एक्सप्रेस (गाडी क्रमांक २२५३७) पाहिली. नंतर त्याने आपला कट पूर्ण करण्यासाठी एसी कोच बी २ मध्ये प्रवेश केला आणि तेथेच त्याने आकाशची गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर त्याचा मृतदेह त्याने कचरापेटीत टाकून पळ काढला. याप्रकरणी पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

