पुणे- येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण आणि सौंदर्यीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे , यासाठी संरक्षण मंत्रालयाच्या सहाय्याने पुणे महापालिका नेमका आराखडा तयार करत असून याबाबत केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नुकतीच आढावा बैठक घेऊन या कामकाजाची माहिती घेतली आणि अधिकाऱ्यांना जोमाने कामाला लागण्याची सूचना केली. या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चंद्रन, विमानतळ संचालक संतोष ढोके, सीएडीओ एअरफोर्स कुलदीप, शहर अभियंता प्रशांत वाघमारे तसेच रस्ते अभियंता अनिरुद्ध पावसकर उपस्थित होते.

यावेळी पुणे विमानतळ परिसराच्या रस्त्यांच्या रुंदीकरण व सौंदर्यीकरणाच्या कामासंदर्भात आज भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI), हवाई दल आणि पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत मोहोळ यांनी रस्त्यांचे रुंदीकरण, फुटपाथ विकास, सांस्कृतिक वारसा संवर्धन तसेच एकूणच विमानतळ परिसराचे सौंदर्यीकरण याबाबत सविस्तर चर्चा केली .संरक्षण मंत्रालयाने या कामांसाठी पुणे महापालिकेला कामाची परवानगी देण्यास सहमती दर्शवली आहे. या निर्णयामुळे विमानतळ परिसरातील प्रवेशमार्ग अधिक सुकर आणि आकर्षक होणार आहेत.असा दावा या बैठकीनंतर मोहोळ यंनी केला आहे.


