ब्लिसफुल विंड्स फाऊंडेशन आयोजित गुरुपौर्णिमा उत्सव
पुणे : सुप्रसिद्ध बासरी वादक, गुरू पंडित रूपक कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून साकारलेली बासरी वादनातील अनोखी रूपरंगी जुगलबंदी, कोलकाता येथील गायक पंडित शुभोमोय भट्टाचार्य यांनी सादर केलेले मल्हार रागातील अप्रचलित प्रकार आणि ब्लिसफुल विंड्स फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांचे बासरी वादन यातून गुरुपौर्णिमेचा अविस्मरणीय सोहोळा रंगला.
निमित्त होते रूपक कुलकर्णी म्युझिक फाऊंडेशन आणि ब्लिसफुल विंड्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवाचे. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात शुक्रवारी (दि. २२ ऑगस्ट) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
एकाच बासरीवादकाने दोन तबला वादकांच्या साथीने केलेले वादन, त्यात दोन स्वतंत्र राग आणि दोन वेगळे ताल यांच्या माध्यामातून रंगत गेलेली सूर-तालाची अनोखी जुगलबंदी कार्यक्रमाचा कळसाध्याय ठरली. या रूपरंग जुगलबंदीत पंडित रूपक कुलकर्णी यांना ज्येष्ठ तबलावादक पंडित मुकुंदराज देव आणि त्यांचे पुत्र रोहित देव यांनी समर्पक साथ करत कार्यक्रमाची रंगत वाढविली.
पंडित रूपक कुलकर्णी यांच्या अनोख्या संकल्पनेतून ही रूपरंगी जुगलबंदी सादर झाली. त्यांनी भूपाली रागातील रूपक ताल आणि यमन रागतील मत्तताल ऐकविताना केलेले सुमधुर बासरी वादन रसिकांना संमोहित करणारे ठरले. त्यांनतर दोन्ही तबला वादकांच्या साथीने शुद्धकल्याण राग सादर करून रसिकांना स्वरवर्षावात चिंब केले. कार्यक्रमाची सांगता बासरीवादनातील मैहर घराण्याचे वैशिष्ट्य असणाऱ्या मांझ खमाज या रागाच्या सादरीकरणाने केली. निसर्गात बरसत असणाऱ्या श्रावण धारा आणि त्याचवेळी रंगमंचावर बरसत असणारे बासरीचे स्वर आणि दोन तबलजींच्या तबल्यातून उमटणारे बोल यांच्या अनोखा संगमातून रसिकांना सूरांच्या अवकाशात विहरत ठेवले. मृगेंद्र मोहाडकर, आदित्य सुतार यांनी सहवादन केले.
कोलकाता येथील सुप्रसिद्ध गायक शुभोमोय भट्टाचार्य यांनी मैफलीची सुरुवात राग गौड मल्हारमधील ‘तोरे मुख चंद्र’ या पारंपरिक बंदिशीने केली. त्याला जोडून द्रुतलयीतील ‘कारे पिरे बदरवा छाए’ ही बंदिश सादर करून ‘तानाना दिर दिर ताना’ हा तराणा बहारदारपणे सादर केला. मल्हार रागातील अभावानेच सादर होणारे अप्रचलित प्रकार ऐकविताना पंडित शुभोमोय भट्टाचार्य यांनी खमाज आणि मल्हार रागांचे मिश्रण असणाऱ्या खमाजी मल्हारमधील ‘रिमझिम रुमझुम बरसे बदरा’ ही बंदिश सादर केली. धूंधिया मल्हार हा अनोखा राग सादर करताना ‘बिजुरी चमके, बदरा गरजे’ ही बंदिश तर बिरजू की मल्हारमधील ‘जंगल बिच बोले मुरवा’ या पारंपरिक बंदिशी ऐकविल्या. त्यांना दिपिन दास (तबला), नचिकेत हरिदास (संवादिनी) यांनी साथसंगत केली.
सुरुवातीस मृगेंद्र मोहाडकर यांच्या ६० शिष्यांचे बासरीवादन झाले. यात आठ वर्षे वयाच्या शिष्यांपासून साठ वर्षे वयाच्या शिष्यांचा सहभाग होता.
कलाकरांचा सन्मान पंडित रूपक कुलकर्णी, मृगेंद्र मोहाडकर यांनी केला तर सूत्रसंचालन रजत जोशी यांनी केले.
रूपरंगी जुगलबंदीत रसिक मंत्रमुग्ध
Date:

