सिंगापूर येथील लेखिका नीला बर्वे यांच्या
“कोवळं ऊन” या कथा संग्रहाचे प्रकाशन आज; शनिवारी होत आहे. त्यानिमित्ताने त्यांची ही ओळख….
मुंबईचे सांस्कृतिक केंद्र समजल्या जाणाऱ्या विलेपार्ले येथे नीलाजी यांचा जन्म झाला. घरात सर्वांना वाचनाची अत्यंत आवड. आजीसुद्धा खूप पुस्तके वाचायची, त्याबद्दल सांगायचीही! पार्ले टिळक शाळा आणि टिळक मंदिर या दोन संस्थांनी त्यांचं बालपण समृद्ध केलं. शाळेत अभ्यास आणि खेळ, सूर्यनमस्कार या सर्वांना सारखाच न्याय असे. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक जडणघडण उत्तम झाली. तिथेच बी.एससी. पर्यंत शिक्षण झाले. पदवीनंतर आवड म्हणून भारतीय विद्याभवन येथे पत्रकारितेचा कोर्स केला. तेथे द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. टाइम्स ऑफ इंडियामध्ये लेखी आणि तोंडी परीक्षा उत्तीर्ण होऊन नोकरीसाठी पत्र आले पण त्याचवेळी लग्न ठरल्याने, बॉण्ड लिहून देता आला नाही आणि आत्यंतिक आवड असलेली नोकरी मुकली ही खंत त्यांना कायम राहिली.
त्यानंतर नीलाजी पार्ले टिळक विद्यालय येथे शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. लग्न होऊन ठाण्याला गेल्या आणि तेथून रोज सकाळी येत होत्या त्यामुळे शाळेतर्फे बी.एड. करून कायमची शिक्षिका म्हणून तेथे रुजू होण्याची संधी नाकारावी लागली. कारण रोज ठाणे येथून, पहाटे साडेतीन वाजता उठून, सकाळी साडेसहाला पार्त्याला येणे कायम जमेल असे वाटले नाही. बँकेच्या परीक्षा दिल्या होत्या आणि सर्वच परीक्षा उत्तीर्ण होऊन जेव्हा नियुक्तीपत्रे आली तेव्हा सर्वांच्या सल्ल्यानुसार स्टेट बँक ऑफ इंडियाची नोकरी स्वीकारली. तीही तशी दूर म्हणजे फोर्ट विभागात होती.
नोकरी आणि घरचे काम सांभाळून लेखनाची आवड जपत नीलाजी या काही वृत्तपत्रांमध्येही लेखन करीत.
तसेच घरी काही वर्षे त्यांनी मुलांच्या शिकवण्या घेतल्या.सोबतच पर्यावरण विषयक काम करणाऱ्या हरियाली या स्वयंसेवी संस्थेचे , ग्रंथालीचे , व्यायाम शाळेचे, शुभंकरोति संस्थेचे अशा विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत.
कर्तृत्ववान परंतु समाजापुढे न आलेल्या ठाण्यातील महिलांचा शोध घेऊन त्यांच्यावर नीलाजींनी एका वृत्तपत्रासाठी लेखमाला लिहिली. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.
बँकेची नोकरी म्हणजे सतत आकड्यांची जुळवाजुळव, पण नीलाजींनी आयुष्यभर आकड्यांची यशस्वीपणे जुळवाजुळव करीत असतानाच आपलं अक्षरप्रेम कधीच कमी होऊ दिलं नाही. बँकेमध्ये बदली होणाऱ्या व सेवानिवृत्त होणाऱ्या प्रत्येकासाठी कवितेमधून निरोप देण्याची पद्धत त्यांनी सुरू केली. आजही प्रत्येकाकडे आपापली कविता आहे.
मुले मोठी झाल्यावरच नीलाजींनी प्रमोशन घेतले. बँकेत अनेक महत्त्वाची कामे सांभाळली. त्यात गृहकर्जे आणि त्यानंतर बँकेच्या सुवर्ण व्यवसायाची जबाबदारी आणि विविध योजना.
त्यानंतर नीलजींची गोव्यात बदली झाल्यावर व्यवस्थापकाच्या पदाबरोबरच येणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी उत्तमरीतीने निभावल्या. शिवाय वेळ काढून काही वृत्तपत्रातही लिखाण केले. पणजी आकाशवाणीवरून कविता, नाट्यछटा, लेख सादर झालेच पण बँकेविषयी माहिती आणि जागृतता यावरही काही भाषणे झाली.
गोवा दूरदर्शनवरूनही त्यांचे कार्यक्रम झाले. गोव्यातील
विविध काव्यसंमेलनांची त्यांना आमंत्रणे असत.
नीलाजींचा “रानफुले “हा काव्यसंग्रह पद्मश्री प्रसाद सावकार यांच्याहस्ते प्रकाशित
झाला आहे.
नीलाजींच्या सेवानिवृत्तीला काही वर्षे असताना एका दुर्घटनेत त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यावेळी त्या गोव्यात ग्रामीण भागांत शाखाप्रमुख होत्या.पुढे नीलाजी सेवानिवृत्त झाल्यावर स्टेट बँकेने तसेच गोव्यातील काही सहकारी बँकांनी, तसेच काही वृत्तपत्रांनीही त्यांच्याकडे रुजू होण्याविषयी विचारले. पण मुलगा राहुल ,जो मद्रास आयआयटी मधून एम टेक
झाला आहे,त्यास हे कळताच त्याने त्यांना सिंगापूरला बोलावून घेतले आणि यापुढे तू नोकरी करायची नाही, खूप केलेस आत्तापर्यंत ,आता तुझे राहून गेलेले छंद पुरे करायचे असे सांगितले.
नीलाजींचे प्रांजळ मत आहे की, जर दुसऱ्या देशात कायमचे रहायला जायचे असेल तर तरुण वयात जावे. नोकरी, वाढता संसार, नव्या जागीं सेटल होण्यास धडपड होते, पण १०-१५ वर्षांत तिथलेच होऊन जातो. सारे आयुष्य एका देशात गेल्यावर, अनेक वर्षांचे स्नेहबंध सोडून दुसरीकडे जुळवून घेणे कठीण जातेच . सारा वेळ मोकळा पण बाकी कोणी नाहीत मोकळे आपल्याबरोबर संवाद साधण्यास. काही मित्रपरिवाराच्या कथा ऐकल्या होत्या. त्यांचे म्हणणे… थोडे दिवस ठीक आहे, जातो वेळ इकडेतिकडे फिरण्यात पण नंतर बोअर होते. त्यांची आपली संस्कृती, खाणे-पिणे, सारेच वेगळे. कसे जुळवून घेणार या वयात? आणि परत आले भारतात. पण त्यामुळे मुलांना काळजीच.नीलाजींनी मात्र ठरविले, मुलाला असल्या टेन्शनमध्ये अडकवायचे नाही. त्याची अपेक्षा किती माफक होती की, आईने निव्वळ आनंदात रहावे! त्याप्रमाणे त्यांनी सिंगापूर महाराष्ट्र मंडळातील उपक्रमांत भाग घेण्यास सुरुवात केली. तसेच या देशाने आधार दिला म्हणून तेथील लोकांसाठी काम करणे हे कर्तव्यच आहे असे मानून विविध संस्थांमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. आरएसव्हीपी सिंगापूर (ज्येष्ठ स्वयंसेवकांची संस्था) या संस्थेत सहभागी होऊन त्यांच्यातर्फे नॅशनल हार्ट हॉस्पिटल, स्त्रिया आणि मुलांसाठी असलेले के. के. हॉस्पिटल, वृद्धाश्रम, इंडियन हेरिटेज अशा निरनिराळ्या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून जाऊ लागल्या. तसेच खेळांची आवड असल्याने अॅक्टिव्ह एसजी या सिंगापूरच्या क्रीडा संस्थेमध्ये सभासद होऊन निरनिराळ्या खेळांच्या स्पर्धेसाठी स्वयंसेवक म्हणून सेवा देऊ लागल्या. आंतरराष्ट्रीय रग्बीसाठी स्वयंसेवक म्हणून काम करताना विदेशातील ८ टॉपमोस्ट टीम्सच्या खेळाडूंच्या स्पर्धा त्यांना बघण्यास मिळाल्या. शिवाय हा खेळ त्या पहिल्यांदाच लाईव्ह बघत असल्याने त्याचे नियम, स्किल इ. सर्व समजावून घेण्याची संधी त्यांना मिळाली. नॅशनल व्हॉलीबॉल चॅम्पिअनशिप, बून ले येथील अॅक्टिव्ह एसजी हॉकी व्हिलेजचा उद्घाटन समारंभ (१७ ऑगस्ट २०१९) येथे फोटोग्राफर म्हणून त्या स्वयंसेवक होत्या.
सिंगापूरला आल्याआल्याच आरएसव्हीपी सिंगापूर या संस्थेला २० वर्षे झाल्याबद्दल त्यांनी लोगो स्पर्धा जाहीर केली होती. एकमेव बक्षिस होते आणि ते २०० डॉलर्स आणि गाला डिनर विथ सिंगापूर प्रेसिडेंट असे होते. नीलाजींची चित्रकलेची आवड उफाळून आली.अथक परिश्रम करून नीलाजी या स्पर्धेत सहभागी झाल्या आणि विशेष म्हणजे प्रथम क्रमांक मिळाला. त्यामुळे त्यांना मुलासह
तेथील राष्ट्रपतींना भेटायची संधी मिळाली. या लोगोमुळे संस्थेतही चांगली ओळख झाली.
नीलाजींना कॅरम लहानपणापासून अतिप्रिय. शिवाय त्या ऑल इंडिया कॅरम फेडरेशनच्या पंच. त्यामुळे सिंगापूर सरकारच्या क्रीडा अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांनी हा खेळ सिंगापूरमध्ये लोकप्रिय करायचा आहे, इथल्या मुलांना शिकवायचा आहे म्हणून सांगितले. काही बैठकीनंतर त्यांनी नीलाजींना कॅरमचे २ संच मंजूर केले त्याचप्रमाणे क्लेमेंटी स्पोर्ट्स हॉलमध्ये जागाही दिली. येणाऱ्या मुलांना (वयोगट ८ ते १४ वर्षे ठेवला होता) कॅरम म्हणजे काय खेळ आहे, सोंगट्या, स्ट्रायकर म्हणजे काय इ. पासून शिकविण्यास सुरुवात केली. मुले खेळांत रस घेऊ लागली, काही बऱ्यापैकी खेळू लागले पण हाय रे दैवा! कोरोनाच्या आक्रमणामुळे त्यांचा हा उपक्रम बंद पडला. काही काळाने असोसिएशन ऑफ कॅरम, सिंगापूर या नव्याने सुरू झालेल्या संस्थेतील एकाने संपर्क साधला. २०२२ मध्ये मलेशिया येथे आंतरराष्ट्रीय कॅरम वर्ल्ड चॅम्पिअनशिप आयोजित केली गेली. एसीएसने सिंगापूरतर्फे सहभाग घेतला .तिथे नीलाजींना अम्पायर म्हणून बोलावले गेले. २८ देशांच्या टॉपर्ससाठी अंपायर म्हणून एक आव्हानच ! पण त्यांनी ते एन्जॉय केले आणि तेथेच इंटरनॅशनल रेफ्रीसाठी परीक्षा दिली. ४ प्रकारात होणाऱ्या या परीक्षेत त्या पहिल्या आल्या.
परत आल्यावर नीलाजी २०२३ मध्ये नॅशनल रैंकिंगच्या स्पर्धेसाठी चीफ रेफ्री होत्या. खेळण्याचे वैयक्तिक प्रयत्न सुरूच होते. पूर्वीचे नैपुण्य नाही पण मग २०२४ मध्ये नॅशनल रैंकिंगमध्ये सहभाग घेतला. त्यात मालदीव येथे झालेल्या आशियाई स्पर्धेसाठी निवड झाली. ही संधी त्याचवेळी त्या भारतात गेल्यामुळे नाही स्वीकारता आली पण त्यांनतर अमेरिका येथे सहाव्या कॅरम विश्वचषक स्पर्धेसाठी पुन्हां निवड होऊन त्या टीमबरोबर गेल्या. खूप चांगले अनुभव मिळाले आणि नुकतीच मे महिन्यात झालेल्या एसीएस नॅशनल स्पर्धेत भाग घेऊन २०२५ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्यांची निवड झाली आहे.
नीलाजी सिंगापूर महाराष्ट्र मंडळाच्या द्वैमासिकात लिहितात .मंडळातील सर्व साहित्यप्रेमी जमून दर महिन्याला कविता सादर करतात. त्यामुळे कितीही व्यस्त असले तरी कविता लिहिल्या गेल्या, असे त्या आवर्जून सांगतात. या मंडळाच्या सर्व उपक्रमांत स्वयंसेवक म्हणून सक्रिय सहभाग घेतातच पण गणपती उत्सवात एकपात्री अभिनयात भाग घेऊन अभिनयाची हौस आणि गणपतीला निरोप देतेसमयी दीड-दोन तास लेझीम खेळून तीही हौस भागवून घेतात.
नीलार्जीच्या आईवडिलांचे देशावर अफाट प्रेम होते. त्यामुळे त्यांनी ना नफा ना तोटा या तत्त्वावर बहुसंख्य लोकांना भारतदर्शन घडविले. अशी समाजसेवा त्या करू शकत नाहीत पण त्यांच्यामुळे लहानपणापासून त्यांना प्रवास खूप आवडू लागला. त्यामुळे त्या वर्षातून एक-दोन सहली एकटीनेच करतात. विविध अनुभव घेत, विविध जीवनपद्धती अनुभवत लोकांना जाणून घेत भ्रमण करतात. अर्थात यासाठी अचानक उद्भवणाऱ्या समस्यांना तोंड देऊन त्यातून बाहेर पडण्याची मनाची तयारी असते.
नीलाजी कथा, कविता, नाटुकलं, अलक, ललितलेखन, प्रवासवर्णन नियमितपणे लिहीत असतात. विशेष म्हणजे पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या अद्वितीय व्यक्तींचे ऋण म्हणून, त्यांचे कार्य सर्वांना समजावे म्हणून त्या
न्यूज स्टोरी टुडे या प्रख्यात पोर्टलवर त्यांची साप्ताहिक लेखमाला सुरू आहे. त्या व्हिडीओद्वारे कथा, कविता सादरीकरणहीकरतात. ऑनलाइन उपक्रमांना परीक्षक म्हणूनही असतात. त्यांना बागकामाची आवड असून त्यांनी सुमारे ६० झाडे बाल्कनी व लिफ्टच्या बाजूच्या जागेत लावली आहेत. तसेच एका ग्रुपला त्या मार्गदर्शनही करतात.
सिंगापूरमध्ये भारतीय सण साजरे करताना त्या शेजाऱ्यांना त्या सणांमागील वैज्ञानिक दृष्टिकोन सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी काढलेल्या रांगोळ्या इमारतीतील लोक आवर्जून बघतात. त्यांची सून सिंगापूर येथील असल्याने, त्यांच्या पद्धती, परंपरा, सण समजावून घेऊन त्यांच्यात सामावून गेल्या आहेत. यांच्याकडे दिवाळीसाठी ज्या माळा लागतात, त्या ख्रिसमस, न्यू इयर, चायनीज न्यू इयर साजरे करीत गुढीपाडव्यापर्यंत लखलखत असतात.सुनेचे माहेर खूप मनमिळावू आहे, त्यांच्या आणि आपल्या संस्कृतीची देवाणघेवाण होत असते. त्यामुळे इथेही स्नेहबंध जुळले. दोन्ही परिवार अनेक ठिकाणी एकत्र जातात, विविध ठिकाणी एकत्र भ्रमण करीत असतात.
अनेक ऑनलाइन कार्यक्रमांचे नीलाजींनी यशस्वी आयोजन केले आहे. आळंदी येथील फुलोरा साहित्य संमेलनात त्या प्रमुख अतिथी होत्या. भारतीय स्त्रीशक्ती, ठाणेतर्फे आयोजित स्वलिखित कथाकथन स्पर्धेत तर ‘आभाळाखालची शाळा’तर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय कला महोत्सवमध्ये नाट्य विभागात तसेच शॉपीझन आयोजित कथास्पर्धेत त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले आहे.
अशा या नीलाजीना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
लेखन: देवेंद्र भुजबळ
_9869484800

