मुंबई- मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना एका परप्रांतीय तरुणाने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला असून, या घटनेमुळे अंधेरी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित तरुणाचा शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. सुजित दुबे असे या तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे मनसे कार्यकर्ते संतप्त झाले होते.मनसेच्या संतप्त भूमिकेनंतर आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआयडीसी पोलिसांनी तातडीने कारवाई केली. आरोपी सुजित दुबे याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटकही करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी योग्य तपास आणि कारवाईचे आश्वासन दिले आहे.
ही घटना अंधेरी पूर्वेतील महाकाली रोडजवळील सुंदरनगर भागात घडली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, सुजित दुबे हा दारूच्या नशेत राज ठाकरे यांना आई-बहिणीवरून शिवीगाळ करताना व्हिडिओत दिसत आहे. राज ठाकरेंना शिवीगाळ केल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांत संताप उसळला आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अंधेरीतील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले. त्यांनी थेट पोलिसांकडे धाव घेत आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. एवढेच नव्हे, तर आरोपीकडून चालवले जाणारे तीन अनधिकृत धंदेही तात्काळ बंद करण्याची मागणी मनसेने केली आहे. आरोपीविरोधात कठोर कारवाई न झाल्यास पोलिस ठाण्याबाहेर तीव्र आंदोलन करणार, असा इशाराही मनसे कार्यकर्त्यांनी दिला.
मराठी लोगो की औकात क्या? तुम भंगार हो…दुसरीकडे, नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात परप्रांतीय व्यक्ती आणि मराठी लोकांमध्ये वाद झाल्याचा प्रकार समोर आला आहे. गाडी शिकत असताना एका परप्रांतीय तरुणाने स्थानिकाच्या गाडीला धडक दिली. यानंतर त्याने ”मराठी लोगो की औकात क्या? तुम मराठी लोक भंगार हो” अशा प्रकारे अरेरावी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही माहिती मनसे कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मनसे कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला मराठीत बोलण्यास सांगितले, मात्र त्याने नकार दिल्याने हा वाद अधिक वाढला आणि कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली. या घटनेनंतर गाडीला धडक दिल्याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्याचे समजते. मात्र, शिवीगाळ आणि मारहाणीबाबत अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

