: अनुबंध सेवा प्रतिष्ठानच्या वतीने गणेश भूषण आणि विघ्नहर्ता कार्यकर्ता पुरस्कार प्रदान
पुणे: निस्वार्थ भूमिका ही भक्तीमध्ये फार महत्त्वाची आहे. जे अध्यात्म भौतिकता समृद्ध करते ते खरे अध्यात्म आहे. गणपती ही केवळ शोभेची, बुद्धीची देवता नाही, ती सर्वांचे कल्याण करणारी देवता आहे. त्याचे रूप विश्वात्मक आहे. उत्सवातून परंपरा जोपासण्याचे काम कार्यकर्ते करतात. कार्यकर्त्यांचा त्याग आणि निस्वार्थ सेवा महत्वाची आहे. संस्कृती ही विचाराने, भक्ती जाणिवेने श्रीमंत व्हावी. समाज सात्विक बनावा. या भूमिकेतून समस्त गणेशोत्सव मंडळे काम करतात,असे मत ज्येष्ठ साहित्यिक डाॅ.श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
अनुबंध सेवा प्रतिष्ठानच्या वतीने गणेश भूषण आणि विघ्नहर्ता कार्यकर्ता पुरस्काराचे आयोजन सदाशिव पेठेतील उद्यान प्रसाद कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी उद्योजक कृष्णकुमार गोयल, कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष कौस्तुभ जाधव,कार्याध्यक्ष अथर्व जाधव आणि प्रकाश ढमढेरे उपस्थित होते.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांना गणेश भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. टिळक रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत सणस, विशाल मित्र मंडळ वडारवाडीचे अध्यक्ष मुकेश पवार, सत्यविर मित्र मंडळ शिवदर्शनचे उमेश वैद्य, श्रमदान मित्र मंडळ गंजपेठेचे मोहन सावंत, अजिंक्य मित्र मंडळ मॉडेल कॉलनीचे उमेश शेवते यांना विघ्नहर्ता कार्यकर्ता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. साऊंड इलेक्ट्रिकल्स जनरेटर्स असोसिएशन चे अध्यक्ष बबलू रमझानी, उपाध्यक्ष शैलेश गायकवाड कार्याध्यक्ष राजू कांबळे यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.
श्रीपाल सबनीस म्हणाले, गणपती ही बुद्धीची देवता आहे. तिला सेवेच्या देवतेमध्ये रूपांतरित करण्याचे काम महेश सूर्यवंशी यांनी दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या माध्यमातून केले आहे. निस्वार्थ सेवेचे प्रकल्प या दगडूशेठच्या माध्यमातून होत आहेत. त्यामुळे दगडूशेठचा कृतिशील देव मला महत्त्वाचा वाटतो. जात धर्म न पाहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारुन गरजूंसाठी त्यांनी काम केले आहे. गणपतीची अनेक मंदिरे आहेत, परंतु दगडूशेठचे महत्व आणि मूल्य वेगळे आहे. असेही त्यांनी सांगितले.
श्रीकांत शेटे म्हणाले, गणेशोत्सव हा धार्मिक उत्सव आहे. समाजाने एकत्र येणे आणि त्यातून प्रबोधन होणे हे उत्सवातून अपेक्षित आहे. परंतु उत्सव सोडून आता कोण पुढे, कोण मागे याची चर्चा जास्त होत आहे. क्रमांक हा व्यवस्थेचा भाग आहे आणि व्यवस्थेला धक्का लागू नये याची काळजी आपण घ्यायला हवी. आपणच आपला सन्मान ठेवला तर जगात सन्मान मिळेल.
कृष्णकुमार गोयल म्हणाले, सगळीच गणेशोत्सव मंडळे धांगडधिंगा करत नाहीत किंवा डीजे लावत नाहीत, परंतु नकारात्मक गोष्टीला जास्त प्रसिद्धी मिळते. सगळ्या गणेशोत्सव मंडळांनी चांगल्या पद्धतीने कोणताही दुराभिमान न ठेवता उत्सव साजरा करावा.
महेश सूर्यवंशी म्हणाले, गणेशोत्सव आपण जोरात साजरा करतोय. परंतु गणेशाकडे, त्याच्या स्वरूपाकडे आपले लक्ष नाही. आपल्या संतानी त्याला वंदन केले आहे. गणेश ही एकमेव देवता ज्याचा उत्सव १७५ देशांमध्ये साजरा होत आहे. त्याचा उत्सव आपण इतक्या उत्साहात साजरा करतोय त्या गणेशाचे स्वरूप आपण समजून घेतले तर ‘आवाजाची मर्यादा’ ओलांडली जाणार नाही.
मानाच्या गणपती मंडळांनी लक्ष्मी रस्त्याने त्यांच्यावेळेप्रमाणेच जावे. त्यांनी त्यांच्या मिरवणुकीच्या ताफेचे आत्मपरीक्षण करावे. तर ज्या मंडळांना सकाळी सात वाजता जायचे आहे त्यांना इतर रस्त्यांनी जाऊ द्यावे, जेणेकरून ही मिरवणूक वेळेत संपेल आणि पुणेकरांना कोणतीही अडचण होणार नाही, असेही त्यांनी सांगितले. पराग ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले. अशोक जाधव यांनी प्रास्ताविक केले.

