पुणे -राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी दिल्लीत भाजपा खासदार कंगना राणौत यांच्या निवासस्थानी राष्ट्र सेविका समितीच्या बैठकीला उपस्थिती लावल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. विरोधकांकडून टीके बाण सोडण्यात येत आहेत. आमदार रोहित पवार यांनीदेखील सुनेत्रा पवार यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
MR.रोहित पवार एवढी पिवळी कावीळ बरी न्हव त्यामुळे जगच पिवळे दिसते तुम्हाला. स्नेहभेट होती स्नेह भेट होती बरं. आता खासदार कंगना राणावत तिच्या घरी कोणाला बोलावते,कोणत्या देवाची पूजा करते हा त्यांचा प्रश्न आहे बरं. खासदार सुनेत्रा वहिनीसाहेब यांच्याशी काही संबंध येत नाही. अशा आशयाची पोस्ट शेअर करत ठोंबरे पाटील यांनी रोहित पवारांना उत्तर दिले आहे.
नेमकं काय म्हणाले होते रोहित पवार?
अजित पवार सत्तेत गेल्याची त्यांची कारणे वेगळी आहेत. पण तिथं गेल्यावर त्यांनी भाजपचे विचार स्वीकारले नसतील, म्हणून कदाचित त्यांच्यावर प्रेशर असेल. एखाद्या बैठकीला, कुठतरी एखादा फोटो येऊ द्या, म्हणजे संदेश जातो की हे सु्द्धा आता आरएसएसचे विचार स्वीकारायला लागले आहेत. एका बाजुला तुम्ही पुरोगामी विचार म्हणता, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेता आणि दुसरीकडे आरएसएसच्या बैठकीला जात असाल, तर ही दुटप्पी भूमिका आहे , अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या कंगना रणौत यांच्या घरी भेट दिल्यानंतर टीका केली होती.

