पुणे-
पोलिसांवर जो राजकीय दबाव येतो त्यामुळे सत्यशोधन करण्याचा रस्ता पोलिस सोडून देतात. मालेगाव बॉम्ब खटला आणि डॉ. दाभोलकर खून खटला तसेच ७/११ ट्रेन बॉम्ब ब्लास्टमधील बळींना न्याय मिळाला नाही. या सर्व केसमध्ये गुन्हेगार आणि कट करणारे निर्दोष सुटले यात व्यवस्थेचे अपयश आहे. या मोठ्या गुन्ह्यांत मृत्युमुखी पडलेल्या लोकांना आपण न्याय देऊ शकलो नाही. याला राजकारणी लोकांचा हस्तक्षेप कारणीभूत आहे असे माजी आय. पी.एस.अधिकारी मीरा बोरवणकर यांनी येथे म्हटले आहे ,शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्र सेवा दल, पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात माजी पोलिस अधिकारी मीरा चड्डा बोरवणकर यांनी डॉ. दाभोलकर यांच्या लिखाणावर आधारित पाच पुस्तकांचे प्रकाशन केले. या ग्रंथमालेचे संपादक प्रभाकर नानावटी, डॉ.शरद बाविस्कर, अंनिस ट्रस्टी अरविंद पाखले हे विचारमंचावर उपस्थित होते.
या प्रकारचे केसेस वर्षानुवर्षे चालतात आणि यामुळे न्याय होत नाही. गौरी लंकेश, गोविंद पानसरे आणि प्रा.कलबुर्गी यांचे केसेस मध्ये तर अजून खटला चालूच झाला नाही, ही भयानक अवस्था आहे. याला उपाय म्हणजे नागरिकांशी तार्किक आणि लोकशाही संवाद वाढवता येईल. लोक दररोजच्या रोजीरोटीच्या कामात एवढी व्यस्त आहे त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. आपली निष्ठा संविधान प्रति असली पाहिजे. आपण मूलभूत हक्काबद्दल बोलतो पण आपण मूलभूत कर्तव्य बद्दल का विसरतो? असा सवालही त्यांनी केला.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे फ्रेंच तत्वज्ञानाचे प्राध्यापक डॉ.शरद बाविस्कर म्हणाले, डॉक्टर दाभोलकर यांचा समाजातील हस्तक्षेप हा केवळ खटाटोप नव्हता तर त्याला एक सैद्धांतिक बैठक होती. आपला आजचा समाज खरंच चिकित्सक बनला आहे का ? जे महत्त्वाचे न्यायाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर समाजात निराशा का असते? पुरोगामी चळवळी महाराष्ट्रात यशस्वी झाल्या. महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्यात संविधानवादी चळवळ होत नाही. आपल्याकडील शैक्षणिक संस्था चिकित्सक मने घडवणारी नाहीत. यावर आपले काम व्हावे. अंधश्रद्धा फक्त आस्था, धार्मिकता नाही तर अर्थकारण, हितसंबंध हे सुद्धा असते. जेव्हा हे हितसंबंध धोक्यात येतात तेव्हा अडचण येते. इथे राजकारणाची भूमिका महत्त्वाची असते. पुरोगामी चळवळीची राजकीय संवादशक्ती कमी पडते. डॉ. दाभोलकर ही आशा आणि ऊर्जा निर्माण करू शकायचे. त्यामुळे त्यांचे वेगळेपण जाणवते.

डॉ. दाभोलकर यांना अभिवादन
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या १२व्या स्मृतिदिनानिमित्त काल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुणे शाखेतर्फे, वि. रा. शिंदे पुलावर त्यांना अभिवादन करण्यात आले. मेळघाट येथे लहान बालकांना पोटावर गरम डागण्या देण्याच्या प्रथेविरुद्ध प्रबोधन करण्यासाठी पुण्याहून काही कार्यकर्ते एक टेम्पो घेऊन मेळघाटला जाणार आहेत. या गाडीला यावेळी विश्वस्त अध्यक्ष गणेश चिंचोले यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. डॉक्टर दाभोलकरांच्या खुनाचे सूत्रधार पकडण्यात यावे अशी मागणी यावेळी अनिसतर्फे करण्यात आली. यावेळी नंदिनी जाधव, मिलिंद देशमुख,, शंकर कणसे,प्रवीण देशमुख श्रीपाल ललवाणी, अनिल वेल्हाळ, भगवान रणदिवे, अरुण जाधव इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

