जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन
२१ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो. या निमित्ताने हा विशेष लेख. सर्व जेष्ठ नागरिक बंधू भगिनींना जेष्ठ नागरिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
_ संपादक.
वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या स्त्री पुरुषांना जेष्ठ नागरिक म्हणतात.जगातील जेष्ठ नागरिकांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासभेने १४ डिसेंबर १९९० रोजी २१ ऑगस्ट हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.या दिनासाठी प्रत्येक वर्षी एक संकल्पना निश्चित करण्यात येते.त्या संकल्पनेनुसार ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या( यात भावनिक, मानसिक समस्या देखील अंतर्भूत आहेत ), सामाजिक,कौटुंबिक परिस्थिती, आर्थिक अडचणी यासारख्या मुद्द्यांवर चर्चा होऊन त्यातून मार्ग काढणे अपेक्षित आहे .या वर्षीची या दिनाची संकल्पना ही
“ज्येष्ठ नागरिकांचे
महत्त्व आणि त्यांचा सन्मान ” ही आहे. त्यामुळे या संकल्पनेनुसार आजच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य तपासणी शिबिरे, जनजागृती मोहिम असे विविध उपक्रम राबविणे अपेक्षित आहे .
भारतातील ज्येष्ठ नागरिक
भारतामध्ये तर या दिवसाचे विशेष महत्व आहे.कारण आपल्या देशात जेष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे .जगात जेष्ठ नागरिकांची संख्या सध्या ८० कोटी ३० लाख इतकी आहे.तीआणखी २० वर्षांनी संख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे.
भारतात आज जेष्ठ नागरिकांची संख्या १४ कोटी इतकी आहे.पुढील २५ वर्षात ती ३० कोटी १९ लाख इतकी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सध्या जेष्ठ नागरिकांची संख्या जवळपास १ कोटी ५० इतकी आहे.
सरकारी योजना:
ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी भारत सरकार आणि संबंधित राज्य सरकारे अनेक योजना राबवित असतात. या योजनांमध्ये आर्थिक सहाय्य, आरोग्य सेवा, प्रवास सवलत , सामाजिक सुरक्षा यांचा समावेश आहे.
केंद्र सरकारच्या योजना _
१)अटल पेन्शन योजना :
ही योजना निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळावे यासाठी आहे. ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले नागरिक या योजनेत सहभागी होऊ शकतात.
२)ज्येष्ठ नागरिक बचत योजना:
ही एक सुरक्षित बचत योजना आहे, जी ६० वर्षांवरील नागरिकांसाठी आहे.
३)इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना_ या योजनेत, ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्ध व्यक्तींना आर्थिक सहाय्य दिले जाते.
४)प्रधानमंत्री वय वंदना योजना_ ज्येष्ठ नागरिकांसाठी ही एक पेन्शन योजना आहे.
५)राष्ट्रीय आरोग्य विमा योजना _या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सेवांसाठी आर्थिक सहाय्य मिळते.
महाराष्ट्र शासनाच्या योजना:
१)मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना :या योजनेत, ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
२)मुख्यमंत्री वयोश्री योजना :
या योजनेत, ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय उपकरणांसाठी किंवा मानसिक आरोग्य केंद्रांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
३)श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना:
या योजनेत, ६५ वर्षांवरील नागरिकांना आर्थिक सहाय्य दिले जाते. आज महाराष्ट्रात जवळपास ४० लाख ज्येष्ठ नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत.
४)ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र :
६० वर्षांवरील नागरिकांना ओळखपत्र दिले जाते, ज्याद्वारे त्यांना विविध सवलती मिळतात.
५)प्रवास सवलत:
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत एसटी बसने मोफत प्रवास करण्याची योजना लागू केली आहे.आरोग्य दृष्ट्या सुदृढ असणाऱ्या आणि हिंडण्याफिरण्याची आवड असलेल्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये ही योजना चांगलीच लोकप्रिय झाली आहे. तर ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमध्ये ५०% सवलत मिळते.
६)वृद्धाश्रम योजना :
ज्येष्ठ नागरिकांसाठी मातोश्री वृद्धाश्रम योजना देखील आहे.
७)संजय गांधी निराधार अनुदान योजना : या योजनेत, निराधार, वृद्ध, विधवा, आणि दिव्यांग व्यक्तींना आर्थिक सहाय्य दिले जाते.
कायदा:
ज्येष्ठ नागरिकांच्या हित रक्षणासाठी “ज्येष्ठ नागरिक कायदा” देखील करण्यात आलेला आहे.
एक खिडकी योजना
महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वी जेष्ठ नागरिकांसाठी महामंडळ स्थापन करण्यात येईल,अशी घोषणा करण्यात आली होती.पण अद्यापही असे महामंडळ स्थापन करण्यात आलेले नाही. ते लवकरात लवकर स्थापन करण्यात यावे. खरे तर जेष्ठ नागरिक ही राष्ट्राची शक्ती आहे.पण त्यांच्या काही समस्याही आहेत. म्हणून भारत सरकारनेच पूर्ण देशासाठी जेष्ठ नागरिक प्राधिकरण स्थापन करून ,जेष्ठ नागरिकांसाठी “एक खिडकी योजना” लागू करावी. तसेच त्यांना देण्यात येणाऱ्या ओळखपत्रामुळे ,ते लाभ घेऊ शकतील,अशा सर्व योजनांचा त्यांना लाभ मिळाला तर त्यांचे जीवन नक्कीच अधिक सुखद
होईल.
लेखन:देवेंद्र भुजबळ
☎️9869484800

