आदर्श मित्र मंडळाच्या वतीने इंडिया स्टार्टअप स्टुडिओ आयोजित परदेशातील नवीन बिझनेस व स्टार्टअप या विषयावरील ‘ले छलांग’ या कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : तुम्ही जेव्हा स्टार्टअप सुरू करता तेव्हा तुमची विनिंग पर्सनॅलिटी असणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकदृष्ट्या सतर्क, बौद्धिकदृष्ट्या तीक्ष्ण आणि आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत असले पाहिजे. त्याचबरोबर सामाजिकदृष्ट्या जबाबदार असणे देखील तितकेच गरजेचे आहे. समाजाच्या गरज समजून त्यांचे समाधान केल्यास स्टार्टअप निश्चितच यशस्वी ठरतो, असे मत एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणेचे कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे यांनी व्यक्त केले.
धनकवडीतील आदर्श मित्र मंडळाच्या वतीने इंडिया स्टार्टअप स्टुडिओ आयोजित ‘परदेशातील नवीन बिझनेस व स्टार्टअप’ या विषयावरील ले छलांग या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन सहकारनगर येथील मुक्तांगण शाळेतील सभागृहात करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी नवी दिल्ली शिक्षण मंत्रालय इनोव्हेशन सेलचे सहाय्यक इनोव्हेशन संचालक प्रदीपकुमार ढगे, व्हेंचर बिल्डर्सचे संस्थापक सुरज जुनेजा, आदर्श मित्र मंडळाचे उदय जगताप, अनिरुद्ध येवले, रणधीर गायकवाड, गणेश दिघे, माऊली पांचाळ, पार्थ जगताप उपस्थित होते. यावेळी स्टार्टअप सुरू करून यशस्वी झालेल्या डॉ. पंकज जैन, प्रशांत वाळुंज, योगेश थिटे, आशिष जगताप, डॉ. अनिरुद्ध जोशी या व्यावसायिकांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर काही स्टार्टअपचे उद्घाटनही करण्यात आले.
प्रदीपकुमार ढगे म्हणाले, बाजारातील ग्राहकांची मागणी काय आहे, हे समजून तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर करून स्टार्टअप सुरू केला, तर तो नक्कीच यशस्वी होईल, यात शंकाच नाही. ग्राहकांच्या मागणीचा विचार करून तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही तुमचे विचार पुढे मांडा. त्याचबरोबर, सरकारच्या अनेक योजनांचा लाभ घेऊन तुम्ही तुमचा स्टार्टअप नक्कीच यशस्वी करू शकता.
उदय जगताप म्हणाले, आजही व्यवसाय क्षेत्रात ठराविक माहिती असलेले व्यवसायच पुन्हा सुरू केले जातात. आजच्या नव्या पिढीला भारताबाहेरील स्टार्टअपविषयी माहिती मिळावी आणि त्याची सुरुवात कशी करावी, हे समजावे, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्रीमंत लोक पैसे कमावतात आणि आणखी श्रीमंत होतात, पण नवीन कल्पना असूनही पैशाच्या कमतरतेमुळे अनेक होतकरू अधिक गरीब होतात. मात्र, योग्य मार्गदर्शन मिळाले तर अनेक जण स्टार्टअप सुरू करून ही दरी कमी करू शकतात. अशा अनेक युवकांना उत्तम मार्गदर्शन व मदत मिळावी, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, असेही त्यांनी सांगितले.

