पुणे : रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 मराठी साहित्य संमेलनाचे यंदा डिसेंबरमध्ये आयोजन करण्यात येणार असून संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवी, गीतकार प्रा. प्रवीण दवणे यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती रोटरी डिस्ट्रिक्ट 3131चे प्रांतपाल संतोष मराठे आणि संमेलन प्रमुख मधुमिता बर्वे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
संमेलनाचे यंदाचे दुसरे वर्ष असून संमेलन शनिवार, दि. 20 आणि रविवार, दि. 21 डिसेंबर 2025 रोजी कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आले आहे. नामवंत साहित्यिक, कवी, विचारवंत, अभ्यासक यांची यंदाच्या संमेलनातही उपस्थिती असणार आहे.
प्रा. प्रवीण दवणे गेली 35 वर्षे मराठी विषयाचे अध्यापन करत असून त्यांच्या कविता, गीतरचना, ललित गद्य, कथा, कादंबरी, नाटक अशा विविध क्षेत्रांतील लेखनाला वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. त्यांच्या विविध पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या असून अनेक साहित्यकृतींना विविध पारितोषिकांनी सन्मानीत करण्यात आले आहे. आजवर त्यांची 140 पुस्तके प्रकाशित झाली असून त्यातील सावर रे!, थेंबातलं आभाळ, रे जीवना, आयुष्य बहरताना, आनंदोत्सव, स्पर्शगंध, मनातल्या घरात, मैत्रबन, अथांग, प्रश्नपर्व या साहित्यकृती वाचकांच्या पसंतीस उतरल्या असून त्यांनी विपुल प्रमाणात बालवाङ्मय निर्मिती केली आहे.
रंगमेघ, ध्यानस्थ, पाऊस पहिला, हे शहरा, गंधखुणा, रुजवात, तो येतोय, एक कोरी सांज, नव्या निरभ्रासाठी आदी काव्यसंग्रह विशेष लोकप्रिय आहेत. प्रा. प्रवीण दवणे यांना साहित्य क्षेत्रातील अनेक मानाचे पुरस्कार मिळालेले असून त्यांची विविध विषयांवर व्याख्यानेही झाली आहेत.
रोटरी क्लबच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविले जातात. आजच्या संगणक तंत्रस्नेही काळात मराठी वाचन संस्कृतीची अभिवृद्धी व्हावी हा संमेलन आयोजित करण्यामागील हेतू आहे.
रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. प्रवीण दवणे यांची निवड
Date:

