राज ठाकरेंचे CM फडणवीसांना आवाहन
मुंबई-अर्बन नक्षलपेक्षा इथं शिस्त लावा. माणसांपेक्षा कबुतरं महत्त्वाची आहेत का? वाहतूक कोंडी फोडा, बुडणारी शहरं वाचवा, मुंबई आणि महाराष्ट्रातल्या शहररावर आदळणारे परप्रांतीय लोंढे थांबवा, असे कळकळीचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले. फडणवीस यांची आजची घेतलेली भेट याच प्रमुख प्रश्नांसाठी होती. त्यासाठी आपण एक छोटासा विकास आराखडा मुख्यमंत्र्यांना दिल्याचे राज म्हणाले.मुंबईकडे येणाऱ्या लोकांची संख्या मर्यादित केली पाहिजे. इतर राज्यांतील शहरांचा विकास केल्याशिवाय मुंबईवरील ताण कमी होणार नाही, असे परखड मत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या भेटीनंतर पत्रकार परिषदेत मांडले.
राज ठाकरे म्हणाले की, सरकारी जमिनींवर झोपडपट्ट्या उभ्या राहतात, पण खासगी जागांवर मात्र कधीही झोपडपट्टी दिसत नाही. याचा अर्थ सरकारला कुठे तरी ठाम भूमिका घ्यावी लागेल. फक्त अर्बन नक्षल यांचा बागुलबुवा निर्माण करून उपयोग नाही. वाहतूक शिस्त हीही एक अत्यंत गरजेची बाब आहे. गौतम अदानी यांच्या घशात जमिनी घातली जात आहे. तिथे काय विकास होणार आहे. उंच इमारती बांधून काही होणार नाही, त्यासाठी जमिनीवर विकास करावा लागेल.
गेल्या काही महिन्यांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेचा उल्लेख करत, राज ठाकरे यांनी सांगितले की त्यांनी वाहतूक कोंडी, पार्किंग आणि शहर नियोजनावर आधारित सविस्तर आराखडा सरकारला दिला आहे. मैदानी जागांच्या खाली 500 ते 1000 गाड्यांचे पार्किंग करता येईल, आणि त्या मैदानांचा उपयोग पूर्ववत राहील, असे त्यांनी सूचवले.
राज ठाकरे म्हणाले की, मी देवेंद्र फडणवीसांना एक छोटा आराखडा दिला. या बैठकीत पोलिस आयुक्त देखील होते. या आराखड्यावर ते काम करतील. अनधिकृत पार्किंगबाबत काय करता येईल, सरकारने कोणती पावलं उचलण्याची गरज आहे. कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत आम्ही एक प्रेझेंटेशन दिले.
राज ठाकरे म्हणाले की, शहरांमध्ये दररोज माणसं आणि इमारती वाढत आहेत, पण रस्ते मात्र तेवढेच राहिले आहेत. रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली अनधिकृत गोष्टी घडत आहेत. पार्किंगची शिस्त लावणं अत्यावश्यक आहे. जे पार्किंग लॉट उभारले आहेत, तिथेही लोक गाड्या लावत नाहीत. ही वृत्ती बदलली पाहिजे. दादरमध्ये 70-80 हजार रुपये प्रति स्क्वेअर फूट दर आहे. तुम्ही रस्त्यावर गाडी पार्क करता तेव्हा ती किती जागा व्यापते हे पाहा. मग पार्किंगसाठी पैसे द्यायला कोणी कचरतं का? सगळं फुकट मिळण्याची अपेक्षा ठेवू नये.
राज ठाकरे म्हणाले की, राज ठाकरे यांनी विविध शासकीय संस्थांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचेही सांगितले. एका यंत्रणेला रस्ता करायचा असतो तर दुसरी तिथे पाइपलाइन साठी खणते. हे थांबवण्यासाठी एकत्रित नियोजन आवश्यक आहे. तुमच्या घरात चार उंदीर झाले तर तुम्ही काय करता? गणपतीचे वाहन आहे म्हणून त्यांना घरात ठेवता का? नाही ना. मग, हे कोणते लोक आहेत जे कबुतरांवर बसून फिरायला जातात? माणसं रेल्वेखाली चिरडून मरतात, खड्ड्यांमध्ये पडून मरतात, पण माणसांपेक्षा कबुतर महत्त्वाची झाली आहेत. हा एक राजकीय विषय आहे. काही लोकांना यावर राजकारण करायचं होतं, पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. आम्ही अशा भलत्याच विषयांवर लक्ष देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
रस्ते खराब झालेच पाहिजेत. कारण ते खराब झाले तरच नवीन टेंडर निघतात
राज ठाकरे म्हणाले की, रस्ते खराब झालेच पाहिजेत. कारण ते खराब झाले तरच नवीन टेंडर निघतात. खड्डे बुजवण्यासाठी नवीन टेंडर काढले जातात. हे सर्व एक प्रकारचे साटंलोटं आहे, जिथे राजकारणी आणि कंत्राटदार यांच्या संगनमताने हा गैरप्रकार सुरू आहे.अनेक वर्षांपासून हे सुरू असले तरी, निकृष्ट काम करणाऱ्या कोणत्याही कंत्राटदाराला शिक्षा होत नाही. लोक खड्ड्यांमुळे मरत आहेत, तरीही याकडे दुर्लक्ष केले जाते. ही समस्या केवळ मुंबई किंवा महाराष्ट्रा पुरती मर्यादित नसून, देशभरातील सर्व शहरांमध्ये हीच परिस्थिती आहे. बाहेरून येणाऱ्या लोकांना महाराष्ट्रातील खड्डे दिसतात, पण त्यांच्या स्वतःच्या राज्यातील रस्त्यांची दुरवस्था दिसत नाही.
बेस्टच्या पराभवावर म्हणाले…बेस्ट पतपेढीच्या 21 जागांसाठी नुकतीच निवडणूक झाली. उद्धव आणि राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच एकत्र येत ही निवडणूक लढवली. त्यामुळे ती विशेष चर्चेत होती. मात्र, या निवडणुकीत ठाकरेंना पराभवाला सामोरे जावे लागले. तर शशांक राव यांच्या पॅनेलचे 14 उमेदवार विजयी झाले, तर महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार निवडून आले. या पराभवाबद्दल राज ठाकरे यांना आजच्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी तुम्हाला रोज आग लावायला हवं, असा टोला प्रसारमाध्यमांनाच मारला. शिवाय या निवडणुका छोट्या आहेत. या लहान गोष्टी आहेत. कुठल्या निवडणुकांबद्दल तुम्ही बोलता? मला त्याच्याबद्दल काहीच माहित नाही. त्या स्थानिक निवडणुका आहेत म्हणत जास्त बोलणे टाळले.

