पुणे-पावसामुळे आज सिंहगड एक्सप्रेस सह डेक्कन क्वीन आणि प्रगती एक्सप्रेस सुद्धा रद्द करण्यात आली आहे. पुण्यातून या तीन रेल्वे दररोज मुंबईसाठी धावतात. दुपारच्या सत्रातील डेक्कन एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस सुद्धा आज रद्द केली आहे. सोलापूर ते पुणे मार्गे मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आज धावणार नाही. काल मुंबईहून पुण्याच्या दिशेने धावणाऱ्या सुद्धा रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. मुंबईतील मुसळधार पावसामुळे या रेल्वे रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पुण्याहून मुंबईसाठी आज कुठल्या ट्रेन रद्द, ते पहा
११०१०: पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस
११००७: पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन एक्सप्रेस
१२१२८: पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंटरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेस
२२१०६: पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंद्रायणी सुपरफास्ट एक्सप्रेस
१२१२६: पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस
१२१२४: पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्विन
२२२२६: वंदे भारत एक्सप्रेस
२०/०८/२०२५ रोजी ११.५० वाजता कोल्हापूरहून सुटणारी ट्रेन क्रमांक १७४१६ KOP-TPTY हरिप्रिया एक्सप्रेस ही पेअरिंग रेक उशिरा धावल्यामुळे २०/०८/२०२५ रोजी कोल्हापूरहून १६.४० वाजता सुटण्याचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.
मुंबई आणि पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाचा फटका बसत असून याचा थेट परिणाम रेल्वे सेवांवर झाला आहे. मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने बुधवारी पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या अनेक महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना गाड्यांची माहिती घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. सकाळी पुणेहून मुंबईकडे धावणाऱ्या सिंहगड एक्सप्रेस, डेक्कन क्वीन आणि प्रगती एक्सप्रेस या तिन्ही महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या. दुपारच्या सत्रात धावणारी डेक्कन एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस सुद्धा आज धावणार नाहीत. याशिवाय सोलापूर-पुणे मार्गे मुंबईकडे जाणारी वंदे भारत एक्सप्रेसही बंद करण्यात आली आहे.
मंगळवारी मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या काही गाड्याही रद्द करण्यात आल्या होत्या. सततच्या मुसळधार पावसामुळे लोकल सेवांसह लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात मोठा बदल करावा लागत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत असून अनेकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वाहतूक व्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. रेल्वे प्रशासनाकडून हवामान लक्षात घेऊन पुढील काही दिवस गाड्यांबाबत वेळोवेळी माहिती देण्यात येणार आहे. प्रवाशांनी नियोजित प्रवासापूर्वी रेल्वेची अद्ययावत माहिती तपासावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

