सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणे भरली असून, पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढल्याने धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 13 फुटांपर्यंत उघडून 95,300 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
दरम्यान कोयना धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू झाल्याने कोयना नदीला पूर आला आहे. यामुळे पाटण तालुक्यातील संगमनगर धक्क्याजवळ पुरात अडकलेल्या 11 माकडांना वाचवण्यासाठी कराडमधील एनडीआरएफच्या (NDRF) टीमने यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन केले. दुपारपासून सुरू असलेले हे थरारक बचावकार्य रात्री उशिरा पूर्ण झाले. स्थानिक नागरिक आणि वन विभागाच्या मदतीने एनडीआरएफच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर माकडांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. या बचाव कार्यामुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे.
कोयना धरण: प्रकल्पाची एकूण क्षमता 105.25 टीएमसी असून, सध्या 101.47 टीएमसी पाणीसाठा आहे (93.66% भरले).
धोम धरण: एकूण क्षमता 13.18 टीएमसी असून, 13.50 टीएमसी पाणीसाठा आहे (97.85% भरले). धरणातून 17,274 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
धोम-बलकवडी धरण: एकूण क्षमता 4.08 टीएमसी असून, 3.82 टीएमसी पाणीसाठा आहे (97.79% भरले). धरणातून 7,329 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
कण्हेर धरण: एकूण क्षमता 10.10 टीएमसी असून, 9.57 टीएमसी पाणीसाठा आहे (96.93% भरले). धरणातून 14,823 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
उरमोडी धरण: एकूण क्षमता 9.96 टीएमसी असून, 9.72 टीएमसी पाणीसाठा आहे (98.29% भरले). धरणातून 8,936 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
तारळी धरण: एकूण क्षमता 5.85 टीएमसी असून, 5.45 टीएमसी पाणीसाठा आहे (94.28% भरले). धरणातून 4,435 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
वीर धरण: एकूण क्षमता 9.83 टीएमसी असून, 9.50 टीएमसी पाणीसाठा आहे (96.50% भरले). धरणातून 55,887 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
तळ कोकण व गोव्याला जाण्यासाठी केवळ आंबोली मार्गे वाहतूक सुरू
दरम्यान, तळकोकण व गोवा या ठिकाणी जाण्यासाठी असलेल्या तीन मार्गांपैकी सध्या केवळ आंबोली घाटमार्गे वाहतूक सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी दिली आहे. सिंधुदुर्गात जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणजे भुईबावडा तसेच करूळ घाट आहे. तथापि, गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे या ठिकाणी दरड कोसळल्या आहेत. दुसरा मार्ग म्हणजे राधानगरी तालुक्यातील फोंडा घाट. या मार्गावर देवगड निपाणी रोडवरील फेजिवडे येथील कब्रस्तान जवळ पुराचे पाणी आल्याने तो सुद्धा मार्ग ,पर्यायाने घाट बंद असल्याचे त्यांनी सांगितले.
राधानगरी धरण
पाणी पातळी :590.86M
पाणीसाठा – 8.28TMC
2 स्वयंचलित द्वारातून – 2856 विसर्ग
मोहिते पावर हाऊसमधून 1500
एकुण विसर्ग – 4356 क्युसेक
राजाराम बंधारा पाणी पातळी : 39.05″ (542.20m)
विसर्ग 56057 क्युसेक (नदी इशारा पातळी 39′ फूट व धोका पातळी 43′ फूट)
धरणांची विसर्ग माहिती
राधानगरी – 4356 क्युसेक
दूधगंगा – 25000 क्युसेक
वारणा – 39663 क्युसेक
कोयना – 95300 क्युसेक
अलमट्टी – 200000 क्युसेक
हिप्परगी – 82800 क्युसेक
कोयना धरणाचे वक्र दरवाजे 13 फुटापर्यंत उघडले
दरम्यान, कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस वाढल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी काल कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 12 फुटांवरून 13 फुटापर्यंत उघडून 93200 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे 2100 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण 95,300 क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
पूर परिस्थितीत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा
दरम्यान, जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तथापि पूर परिस्थितीत जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. तसेच गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. आबिटकर म्हणाले की, मागील दोन दिवस जिल्ह्यात धरण परिसरात पावसाचे प्रमाण वाढल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन पूरस्थिती निर्माण होवू शकते. तथापि नागरिकांनी घाबरुन न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे. पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे. पूरस्थिती उद्भवू नये, यासाठी प्रशासकीय यंत्रणेच्या वतीने सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.
अलमट्टी व हिप्परगीच्या यंत्रणांशी समन्वय ठेवा
त्यांनी सांगितले की, राधानगरी व काळम्मावाडी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असून नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पूर परिस्थितीच्या अनुषंगाने सतर्क रहा. मुख्यालय सोडू नका. गावपातळीवर सूक्ष्म नियोजन करा. नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही जीवित हानी होणार नाही, याची दक्षता घ्या. अलमट्टी धरणातून जास्तीत जास्त विसर्ग होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे कर्नाटक सरकारच्या संपर्कात असून जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनीही अलमट्टी धरण व हिप्परगी बंधाऱ्याच्या विसर्गाबाबत धरणाच्या यंत्रणांशी समन्वय ठेवावा, असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

