पुणे- कोणा भलत्या सलत्याच्या नादाला लागू नका आता महापालिकेत कायम स्वरूपी नौकरी नाहीच ,विशिष्ट कालावधी साठी कंत्राटी भरती होते तीही कशी होते ते जाणून घ्या आणि फसवेगिरी करणाऱ्या एजंटांपासून दूर राहा असा सल्ला खुद्द महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला आहे.
त्यांनी या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि,’पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून विविध पदांच्या भरती प्रक्रियेसाठी वेळोवेळी स्थानिक दैनिक वर्तमानपत्रात सविस्तर जाहिरात देऊन तसेच महानगरपालिकेच्या https://www.pmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्धीस देऊन पात्र उमेदवारांकडून https://www.pmc.gov.in/l/recruitment यावर ऑनलाईन स्वरुपात अर्ज मागविण्यात येऊन पारदर्शकरित्या पदभरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येते.
याद्वारे सर्व नागरिकांना / उमेदवारांना आम्ही सूचित करत आहोत कि, कोणत्याही परिस्थितीमध्ये पुणे महानगरपालिका कर्मचारी भरतीबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये. कायम नोकरी मिळेल असे सांगणारे दावे पूर्णपणे खोटे आहेत. तसेच कंत्राटी कर्मचारी देखील विशिष्ट कालावधीसाठी नियुक्त केले जातात. त्यांना कायम करण्याचा कोणताही अधिकृत प्रस्ताव अथवा योजना अस्तित्वात नाही. कोणी व्यक्ती नोकरी संदर्भात खोटे दावे करत असल्यास, पैसे मागणी अथवा खोटी माहिती देत असल्यास अशा प्रकरणाची माहिती तात्काळ संबधित विभागाला द्यावी. तरी, कोणत्याही मध्यस्थ / दलाल / परिचित / अपरिचित व्यक्तीशी पदभरतीबाबत आर्थिक व्यवहार अथवा इतर तत्सम स्वरुपाची देवाण-घेवाण करू नये. अशा व्यक्तींकडून नागरिकांची/उमेदवारांची दिशाभूल व फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्या स्वरुपाची फसवणूक झाल्यास त्यास पुणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही, याची सर्व नागरिकांनी/उमेदवारांनी नोंद घ्यावी.
पुणे महानगरपालिकेत कर्मचारी भरती करावयाची झाल्यास त्याबाबतची संपूर्ण माहिती व सविस्तर जाहिरात अधिकृत दैनिक वर्तमानपत्रांत व पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानुसार नागरिकांनी/उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन माहिती उपलब्ध करून घ्यावी.असेही महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी म्हटले आहे.

