पुणे- महापालिकेचा मिळकत कर अगर मिळकत कराची थकबाकी कमी करून देतो असे सांगून नागरिकांकडून पैसे उकळणाऱ्या भामट्यांचा महापालिकेत सुळसुळाट झाला असून अशा तथाकथित एजान्तांपासून नागरिकांनी सावध राहावे आणि थेट महापालीकेशीच संपर्क करून आपल्या कामाबाबत योग्य ते मार्गदर्शन घेऊन कार्यवाही करावी महापालिका सर्वांना सहकार्य करणार आहे अशी ग्वाही कर आकारणी व कर कर संकलन प्रमुख व महापलिका उप आयुक्त अविनाश सकपाळ यांनी येथे दिली आहे .
या संदर्भात त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि,’पुणे महानगरपालिका हद्दीतील मिळकतधारकांना आवाहन करण्यात येते की, काही मध्यस्थ/दलाल/परिचित/अपरिचित/व्यक्तीं मिळकतकर कमी करून देतो/थकबाकी कमी करून देतो असे सांगून नागरिकांकडून रोख स्वरुपात पैसे घेत असल्याचे निदर्शनास येत आहे अशी कोणी व्यक्ती कर कमी करून देणे संदर्भात खोटे दावे करत असल्यास, पैशांची मागणी करत असल्यास अशा व्यक्तीसोबत कोणताही आर्थिक व्यवहार अथवा इतर तत्सम स्वरुपाची देवाण-घेवाण करू नये. अशा व्यक्तींकडून नागरिकांची दिशाभूल व फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्या स्वरुपाची फसवणूक झाल्यास पुणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. नागरिकांनी आपला मिळकत कर पुणे मनपाची अधिकृत वेबसाईट propertytax.punecorporation.org या संकेतस्थळावर, मनपाचे नागरी सुविधा केंद्र (CFC), बँक ऑफ महाराष्ट्र, आय.सी.आय.सी.आय. बँक, कॉसमॉस बँक, जनता सहकारी बँक, पुणे येथेच रोख/धनादेश/डी.डी. ने भरावा व त्याची अधिकृत पावती घ्यावी.

