मुंबई-दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने प्रतिष्ठेच्या बनलेल्या बेस्ट एम्प्लॉइज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचा बहुप्रतीक्षित निकाल अखेर जाहीर झाला आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या ‘उत्कर्ष’ पॅनलचा दारुण पराभव झाला असून, त्यांना 21 पैकी एकही जागा मिळवता आलेली नाही. दुसरीकडे, शशांक राव यांच्या पॅनलने 14 जागा जिंकत एकहाती यश संपादन केले, तर महायुतीच्या पॅनलला 7 जागांवर समाधान मानावे लागले.
बेस्ट पतपेढीवरील ठाकरेंच्या शिवसेनेची नऊ वर्षांची सत्ता या पराभवाने संपुष्टात आली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढण्याचा विचार करत असताना, दोन्ही पक्षांसाठी हा निकाल मोठा धक्का मानला जात आहे.
या निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) प्रणित बेस्ट कामगार सेना आणि मनसे बेस्ट कामगार कर्मचारी सेना यांनी एकत्र येत ‘उत्कर्ष’ पॅनलची स्थापना केली होती. त्यांच्या विरोधात भाजपचे आमदार प्रसाद लाड, नितेश राणे आणि शिवसेना (शिंदे गट) चे किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे ‘सहकार समृद्धी’ पॅनल रिंगणात होते. तसेच, बेस्ट वर्कर्स युनियन पुरस्कृत शशांक राव पॅनलनेही जोरदार टक्कर दिली.
निकाल जाहीर झाल्यावर शशांक राव यांच्या पॅनलने 14 जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले, तर महायुतीच्या ‘सहकार समृद्धी’ पॅनलला 7 जागा मिळाल्या. या पराभवामुळे ठाकरे बंधूंच्या युतीची चिंता वाढली असून, आगामी काळात त्याचा राजकीय परिणाम काय होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकूण निकाल (21 जागा):
शशांक राव पॅनेल – 14 जागा
महायुती सहकार समृद्धी पॅनेल – 7 जागा
उत्कर्ष पॅनेल (ठाकरे गट + मनसे) – 0 जागा

