पुणे : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना धमकी देणाऱ्या कीर्तनकारावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
“आम्ही नथुराम होऊ” अशी भाषा थोरातांना उद्देशून त्या कीर्तनकाराने करणं म्हणजे त्यात थेट महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचा गौरव आहेच आणि त्याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची सरळसरळ धमकी देण्याचा हा प्रकार आहे. ह.भ.प.म्हणवणाऱ्या कीर्तनकाराने जीवे मारण्याच्या धमक्या देणे परंपरेला शोभणारे नाही. वारकरी संप्रदायाची परंपरा ही संत, भक्ती, समता आणि अहिंसेवर आधारलेली आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांच्या शिकवणुकीतून ही परंपरा उभी राहिली. पण, आज त्याच वारकरी परंपरेत काही विखारी प्रवृत्ती घुसवून द्वेष, हिंसा आणि दहशतीचं विष पेरलं जातंय. अध्यात्माच्या नावाखाली लोकांच्या मनात हत्या व दहशतवादाचं समर्थन पेरलं जातंय हे वारकरी परंपरेच्या आत्म्यालाच कलंक लावणारं आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
हिंसा पसरवणाऱ्या, धमक्या देणाऱ्या आणि गांधी हत्येचे समर्थन करणाऱ्या या प्रवृत्तीचे त्वरीत सामाजिक, राजकीय आणि कायदेशीर रित्या निर्मुलन झालेच पाहिजे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
महाराष्ट्र शिव, शाहू, फुले, आंबेडकरांची भूमी आहे. महाराष्ट्र संत, वारकरी व भक्तीच्या समतेच्या परंपरेचा आहे. नथुरामाचा गौरव करणाऱ्यांना या भूमीत स्थान नाही, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले असून कीर्तनकारावर कठोर कारवाई व्हावी, अन्यथा फडणवीस सरकार आणि भाजप अशा प्रवृत्तींचे समर्थन करीत आहेत, असेच समजले जाईल, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

