पुणे- पोलीस म्हटले कि त्याबद्दल समाजात काय काय समज आहेत यावर बोलायला नकोच . अर्थात पोलीस आणि जनता यांच्यातील नाते संबध अजूनही फारसे दुरावलेले नाहीत . सामान्य जनतेला त्रास देणाऱ्या प्रवृत्ती पोलीसदलात काही स्वरुपात असतीलही आणि अशा प्रवृत्तीवर कायम मोठा प्रकाश झोत देखील टाकला जातो ..पण हि कथा अगदीच वेगळी आहे. पोलीसातला माणूस , आणि जनतेला कुटुंब मानून काळजी घेणारी पोलिसांची ‘दामिनी या कथेतून प्रत्यक्षात साकार झाली आहे. हि कुठल्या सिनेमाची कथा नाही तर पुण्यात प्रत्यक्षात घडलेली कथा आहे .पुणे पोलिसांची मान या कथेने निश्चित उंचावणार तर आहे पण मनामनात घर देखील करणार आहे.
शाळेत 10 वी इयत्तेत topper असलेली विद्यार्थिनी तिच्या आई वडिलांच्या कौटुंबिक जीवनाचे पडसाद तिच्या आयुष्यावर कसे पडलेले असतात आणि त्या नैराश्यातून ती घर सोडून जाण्याच्या मनस्थितीत कशी पोहोचते.. आणि त्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील दामिनी मार्शल कशी या कुटुंबातील पेच , गुंतागुंत सोडवून पुन्हा एका हसत्या खेळत्या जीवन मार्गावर या कुटुंबाला कशी वळविते त्याची हि कहाणी आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काल दि.१८.०८.२०२५ रोजी वेळ १०.ते १०.१५ वाजताचे दरम्यान दामिनी मार्शल हिंगे – 10920 यांचे मोबाईलवर एका अनोळखी नंबर वरुन कॉल आला.. , दामिनी दीदी तुझ्या मदतीची मला गरज आहे. प्लीज मला मदत कर. तू आमच्या शाळेत आली होती तेव्हा तू तुझा मोबाईल नंबर मुलीना दिला होता आणि बोलली होतीस की तुमच्या संकट समयी मला कधीही कॉल करा…. मी तुमच्या मदतीला येईल….
“यावेळेस त्या मुलीने सांगितले की दीदी मी घर सोडून चालली आहे. मला खूप टेन्शन आहे” सदर वेळेस दामिनी मार्शल हिंगे यांनी आधाराचे बोल बोलून थांबण्यास सांगून तात्काळ या मुलीची समक्ष भेट घेतली . तिच्याशी आपुलीकी साधली त्यावेळेस कळले कि सदर मुलगी हि इ 10 वि कक्षेमध्ये शाळेमध्ये टॉपर आहे तिचे आई बाबा एकत्र राहत नाहीत. त्यांची घटस्फोट केस कोर्टात चालू आहे. ते सतत भांडत असतात तिचा अभ्यास होत नाही तिचे कुठेही लक्ष लागत नाही.ती दामिनीला सांगत होती, दीदी मला जगावस वाटत नाही. मी खूप टेन्शन मधे आहे.
या मुलीचा विश्वास संपादन करून तिचे मनपरिवर्तन करून मुलीच्या शाळेत जाऊन प्रिंसिपल मॅडम ची भेट दामिनीने घेतली. मुलीच्या आई वडिलांना शाळेत बोलावून घेऊन त्यांना त्यांच्या मुलीच्या संदर्भात चर्चा करून त्यांना पटवून दिले ,‘ तुमची मुलगीच तुमच भवितव्य आहे. अशा कोवळ्या जीवास जपा.’ आई वडिलांच्या आयुष्याचे ध्येय मुलांना सावरणे ,योग्य मार्गावर नेणे त्यांची काळजी घेणे असले पाहिजे, कुटुंबाच्या आनंदी जीवनाला हवे तरी काय असते ? या मुलीच्या आई वडिलांचेही मनपरिवर्तन करून त्यांनी आपल्या मुळे आपल्या मुलीचे हाल करायचे नाही असे ठरवले व त्यांनी घटस्फोट बाबत केस मागे घेण्याचे ठरवले आणि आम्ही एक आनंदी कुटुंब म्हणून राहण्याचा निर्णय घेतला .हि मुलगी आता तिच्या आई बाबां सोबत एकत्र राहण्यास मिळत आहे म्हणून खूप खुश आहे . या मुलीने,प्रिन्सिपल मॅडम आणि सदर मुलीच्या पालकांनी दामिनी मार्शल व पोलीस प्रशासन यांचे खूप मनापासून आभार मानले आहेत.

