पुणे-
श्रावण महोत्सवानिमित्त मिती ग्रुप आणि स्त्री आधार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भव्य पाककला स्पर्धा’ आज टिळक वाडा, लोकमान्य सभागृह, पुणे येथे उत्साहात पार पडली. विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विशेष सहकार्याने ही स्पर्धा रंगली असून, पुणेकर महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत विविध स्वादिष्ट आणि आकर्षक पदार्थांची मेजवानी सादर केली.
या वेळी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “श्रावण महोत्सव हा स्त्रियांच्या आनंद, एकोपा आणि सर्जनशीलतेचा सोहळा आहे. पाककला स्पर्धा ही केवळ चव आणि परंपरेचा उत्सव नसून महिलांना आत्मविश्वास, संधी आणि उद्योजकतेकडे नेणारे व्यासपीठ आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, महिलांनी घरगुती स्वयंपाकघरातून उद्योगजगताकडे टाकलेले पाऊल हे समाजासाठी प्रेरणादायी आहे. “भारतात महिलांनी घेतलेल्या कर्जाची ९९ टक्के परतफेड केली जाते, हा विक्रम देशाच्या प्रगतीचा द्योतक आहे. त्यामुळे बँकाही महिलांना उद्योग उभारण्यासाठी उत्साहाने कर्ज देत आहेत,” असेही डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.
सोमवारचा उपवास असूनही महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून समाधान व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, “या स्पर्धेमुळे महिलांच्या कलागुणांना छंदापुरते न राहता रोजगार आणि उद्योजकतेचे नवे दालन खुले होणार आहे.”
या कार्यक्रमासाठी कुणाल टिळक यांचे विशेष सहकार्य लाभले. मिती ग्रुप आणि स्त्री आधार केंद्राच्या कार्यकर्त्यांनी व उत्तरा मोने यांनी उत्कृष्ट संयोजन करून स्पर्धेला संस्मरणीय रूप दिले.

