५१,२०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस वाढल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८:०० वा. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे ६ फुटांवरून ८ फुटापर्यंत उघडून ५१,२०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे.कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण ५३,३०० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

मुंबईतील सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालयांसह शाळा, कॉलेज बंद
मुंबई-भारतीय हवामान खात्याने आज मंगळवार, दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात (मुंबई शहर आणि उपनगरे) अति मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. त्याचप्रमाणे, मुंबईत सातत्याने पाऊस कोसळतो आहे.
मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतेक भागात कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसामुळे मुंबईची परिस्थिती बिकट आहे. मुंबईकरांना कोणताही दिलासा मिळत नसल्याचे दिसून येत आहे. आजही सततचा मुसळधार पाऊस सुरू आहे. सोमवारी रात्रीपासून मुंबईत पाऊस पडत आहे. मंगळवारी सकाळपासून पाऊस आणखी तीव्र झाला आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचले आहे. हवामान खात्याने मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागात रेड अलर्ट जारी केला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले की, राज्यातील अनेक भागात सततच्या पावसामुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, नांदेड जिल्ह्यात 200 हून अधिक ग्रामस्थ अडकले आहेत, ज्यामुळे बचाव आणि मदत कार्यासाठी सैन्य तैनात करण्यात आले आहे. कोकणातील काही नद्यांची पाण्याची पातळी धोकादायक पातळी गाठली आहे आणि जळगावमध्ये मोठे नुकसान झाले आहे.
विक्रोळीत सर्वाधिक 255.5 मिमी पावसाची नोंद
18 ऑगस्ट 2025 सकाळी 08:30 पासून 19 ऑगस्ट 2025 सकाळी 08:30 पर्यंत (मिमी मध्ये)
विक्रोळी: 255.5 मिमी
भायखळा: 241.0 मिमी
सांताक्रूझ: 238.2 मिमी
जुहू: 221.5 मिमी
वांद्रे: 211.0 मिमी
कुलाबा: 110.4 मिमी
महालक्ष्मी: 72.5 मिमी


