“१०१ वर्षांच्या वयातही प्रेरणादायी कलाविष्कार घडवणारे राम सुतार हे भारताच्या सांस्कृतिक वारशाचे खरे संवाहक” — डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई, — जगभर भारताचा मान उंचावणारे, १०१ वर्षीय ऋषीतुल्य शिल्पकार राम सुतार यांचा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन भव्य सन्मान करण्यात आला. या प्रसंगी सुप्रसिद्ध शिल्पकारांचे सुपुत्र अनिल सुतारही उपस्थित होते.
राम सुतार यांच्या कलाकृती ही केवळ शिल्प नसून इतिहासाची जिवंत साक्ष आहेत. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’सारखा भव्य प्रकल्प, संसद भवनातील महात्मा गांधींची प्रतिमा, तसेच सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, गोविंद वल्लभ पंत यांसह अनेक महापुरुषांच्या मूर्ती त्यांनी साकारल्या. पन्नासहून अधिक भव्य शिल्पांची निर्मिती करणाऱ्या सुतार यांच्या कलेत वास्तवदर्शी तपशील, मानवी भावना आणि अप्रतिम कलावैभवाचा संगम दिसतो.
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गौरव करताना सांगितले,“राम सुतार हे फक्त शिल्पकार नाहीत, तर भारताच्या सांस्कृतिक परंपरेचे जिवंत प्रतीक आहेत. त्यांनी आपल्या शिल्पांमधून देशभक्ती, एकात्मता आणि मानवी मूल्यांचा प्रभावी संदेश दिला आहे. १०१ वर्षांच्या वयातही त्यांचा उत्साह आणि कलाविष्कार पाहून प्रेरणा मिळते, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.”आपल्या अविस्मरणीय योगदानासाठी राम सुतार यांना यापूर्वी पद्मश्री (१९९९), पद्मभूषण (२०१६), टागोर पुरस्कार (२०१६) यांसह असंख्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत

