पुणे, दि. १८ ऑगस्ट २०२५ —
शिवसेना पुणे शहराच्या श्रावण महोत्सवानिमित्त द्वारका गार्डन, सुनिता नगर, वडगावशेरी येथे भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन विधान परिषद उपसभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे संयोजन हेमंत बत्ते यांनी केले होते. मनोज अष्टेकर, गौरव कश्यप, उदय खांडके, प्रणव जोशी, दिनेश मुकुलकड, उत्तम नार्वेकर, श्रीकांत अप्पा कुलकर्णी, तुषार टाकळकर, रोहन साळवी आदींनी स्पर्धेचे आयोजन यशस्वी केले.
या प्रसंगी बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “आज श्रावणी सोमवार असून महिलांच्या भजनी मंडळाचा कार्यक्रम हा खरोखरच प्रेरणादायी आहे. महिलांच्या आवाजातली भक्ती ऐकताना संत जनाबाईंची आठवण होते. घरची जबाबदारी सांभाळून जेव्हा महिला अशा पवित्र कार्यात सहभागी होतात तेव्हा त्या संपूर्ण समाजाला नवा आत्मविश्वास देतात.”
तसेच महिलांच्या विकासाबाबत बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “महायुती सरकारने स्त्रियांना अर्ध्या तिकिटात प्रवासाची सुविधा दिल्यामुळे एसटी महामंडळ पुन्हा नफ्यात आले आहे. हजारो महिला एसटीने प्रवास करू लागल्याने एसटीच्या अर्थचक्राला गती मिळाली आहे. तसेच महिलांचे बचत गट, उद्योजकता यामुळे ग्रामीण व शहरी भागात आर्थिक चक्राला बळकटी मिळत आहे. महिलांना दिलेली कर्ज ९९% परतफेडीचा विक्रम करतात हीच त्यांची विश्वासार्हता आहे. महिलांनी घेतलेले कर्ज फक्त परतफेडच नव्हे तर अनेक ठिकाणी रोजगारनिर्मिती आणि कुटुंबाच्या स्थैर्याला बळ देण्यासाठीही मोलाचे ठरले आहे.”
या कार्यक्रमाला शिवसेना पुणे शहर संघटक आनंद गोयल, दिलीप देवकर, विनोद गलांडे, अनिता परदेशी, पद्मा शेळके, चेतन गलांडे, लक्ष्मण सावंत, धनंजय शिंदे, मोहिते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

