- माजी आमदार मोहन जोशी यांचे
महापालिका आयुक्तांना पत्र
पुणे : वाहतूक कोंडी सुटण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक आणि सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल वाहतुकीसाठी तातडीने खुले करावेत, भाजपच्या ‘इव्हेंट’ची वाट पाहात बसू नका, अशा मागणीचे पत्र माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना दिले आहे.
मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांना वेळ मिळत नसल्याने या दोन पुलांचे उदघाटन थांबले आहे, अशी माहिती मिळते. हा प्रकार पुणेकरांचा मनःस्ताप वाढविणारा आहे. सिंहगड रस्त्यावरील गंगा भाग्योदय चौक ते विठ्ठलवाडी या मार्गांवर उड्डाणपुलाचे काम पूर्ण झालेले आहे. तसेच विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे कामही पूर्ण झालेले असल्याने हे दोन्ही पूल वाहतुकीसाठी तातडीने खुले करून वाहनचालकांची कोंडीतून मुक्तता करून, त्यांना दिलासा द्यायला हवा, असे मोहन जोशी यांनी पत्रात म्हटले आहे.
या दोन्ही ठिकाणी नागरी वस्ती वाढली आहे. त्यामुळे रहदारीही वाढली आहे. या दोन्ही ठिकाणांवरून दिवसभरात अक्षरशः हजारो वाहने येत जात असतात. गर्दीच्या वेळी तीन-तीन तास वाहतूक कोंडी होते. आता गणेशोत्सव काळात वाहतुकीत अजून भरच पडेल. मग, पुणेकरांची कोंडी कशासाठी करत आहात? असा सवाल मोहन जोशी यांनी आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात केला आहे.
सत्ताधाऱ्यांना उदघाटनाच्या निमित्ताने एक ‘इव्हेंट’ करून निवडणुकीत राजकारण साधायचे आहे. या वृत्तीला काँग्रेस पक्षाचा विरोध आहे. प्रशासनाने हे पूल वाहतुकीसाठी खुले करावेत, अन्यथा काँग्रेस आंदोलन करेल, असा इशारा मोहन जोशी यांनी पत्रात दिला आहे.

