पुणे- महाबळेश्वर ग्रामपंचायत हद्दीमध्ये जो टोल वसुली करत आहात तो महाबळेश्वर नगरपालिकेने त्वरित थांबवावा असा इशारा श्री क्षेत्र महाबळेश्वर ग्रामपंचायतीने दिला आहे . याबाबतचे पत्र महाबळेश्वर नगरपालिका मुख्याधिकारी यांना ग्रामपंचायत सरपंच यांनी दिले आहे . जोपर्यंत डचेस रस्ता वाहतुकीसाठी योग्य होत नाही तोपर्यंत नगरपालिकेच्या माध्यमातून होत असलेली श्रीक्षेत्र महाबळेश्वर ग्रामपंचायत हद्दीतील टोल वसुली थांबवावी अन्यथा आंदोलनाला तोंड देण्याची तयारी ठेवावी असे सरपंच यांनी म्हटले आहे
या पत्रात त्यांनी असेही म्हटले आहे कि गेली एक वर्ष रस्त्याची काम करत आहात त्यासाठी तो रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला. एवढा प्रदीर्घ काळ आपण हा रस्ता बंद ठेवला परंतु अद्यापही वाहतूक सुरळीत होत नाही. रस्ता अरुंद केला आहे व साईट पट्ट्या भरल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे महाबळेश्वर पर्यटनाचे नाव आपल्या डीसाळ कारभारामुळे खराब होत आहे. त्यामुळेच या परिसरातील व्यवसाय करणाऱ्यांबरोबरच पर्यटकांना प्रचंड मानसिक त्रास आणि आर्थिक नुकसान होत आहे. याआधीही आपल्याला विविध माध्यमांच्याद्वारे, लोकप्रतिनिधींच्या द्वारे, आमदार, मंत्री महोदय यांच्यामार्फत अनेकदा विनवण्या करूनही आपण या रस्त्याच्या बाबत उदासीन भूमिकेत आहात. आपल्याला अतिशय नम्रपणे कळविण्यात येते की जोपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी अनुकूल होत नाही. तोपर्यंत आपण श्रीक्षेत्र महाबळेश्वर ग्रामपंचायत हद्दीमध्ये जो टोल वसुली करत आहात. तो त्वरित थांबवावा नाहीतर आम्हाला पुढील कार्यवाहीसाठी कायदेशीर मार्गाने तसेच आंदोलनातून विरोधातील भूमिका घेण्यास प्रवृत्त करु नये.

