पुणे : मुधमती संगीत विद्यालयाचे संचालक नचिकेत अनंत मेहेंदळे यांनी लिहिलेल्या ‘चक्रधार’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी भावे हायस्कूल येथील प्र. ल. गावडे सभागृहात डॉ. माधुरी डोंगरे, पं. आनंद गोडसे, पं. रामदास पळसुले आणि पं. विजय दास्ताने, डॉ. दयानंद घोटकर यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाची सुरुवात शिवस्तवनाने झाली. तन्मयी मेहेंदळे-कुलकर्णी यांनी शिवस्तवन सादर केले. नचिकेत मेहेंदळे यांचे शिष्य सिद्धार्थ कुंभोजकर, ओंकार जोशी यांनी चक्रधारवादन केले. साहिल पुंडलिक यांनी लेहऱ्याची पेटीवर साथ केली.सर्व मान्यवरांचा सत्कार नचिकेत मेहेंदळे व निवेदिता मेहेंदळे यांनी केला.
अध्यक्षीय भाषण करतांना डॉ. माधुरी डोंगरे म्हणाल्या, नचिकेत मेहेंदळे यांनी अनेक विद्यार्थी घडविले आहेत. यांच्यासारखी विद्यार्थी घडविणारे शिक्षकांची पिढी तयार व्हावी. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुंच्या ज्ञानाचा पुरेपुर वापर करुन आपल्या पुढील पिढीला घडविण्यासाठी शिकले पाहिजे, असेही यावेळी त्या म्हणाल्या.
तसेच पं. रामदास पळसुले यांनी चक्रधार आणि तबला यातील महत्व आपल्या मानतोगतातून व्यक्त केले आणि त्यांचे परममित्र नचिकेत मेहेंदळे यांच्याविषयी हृद्य भावना व्यक्त केल्या.
पं. आनंद गोडसे म्हणाले, तबल्याचे शिक्षण देणारे पुस्तक बाजारपेठेत उपलब्ध नाही. मेहेंदळे यांनी संगीताचा पूर्ण अभ्यास करुन चक्रधार पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक विद्यार्थ्यांच्या कलेत नक्कीच भर टाकरणारे राहिल.
मेहेंदळे सरांची शिकविण्याची पद्धत खुप सुंदर आहे. कोणताही ताल शिकविण्याबरोबरच आमच्यात मोठा आत्मविश्वास त्यांनी निर्माण केला. तबल्याच्या शिक्षणापासून ते मराठी भाषा शिकविण्याचे काम त्यांनी केले असल्याचे यावेळी त्यांच्या शिष्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
विद्यावाचस्पती डॉ. दयानंद घोटकर म्हणाले, तबल्यामधील काव्य, शब्द, साहित्य विविध प्रकारे मांडता येतात. तबल्याचा सूर आणि ताल एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. नचिकेत मेहेंदळे यांनी चक्रधार पुस्तकातून तबला वादनातील सौंदर्य उलगडले आहेत. यात तबला वादनात आपल्या कौशल्याचा शोध घेतला आहे.
प्रस्ताविक नचिकेत मेहेंदळे यांनी केले. त्यांनी ‘चक्रधार’ पुस्तकाविषयी माहिती दिली. हे पुस्तक विद्यार्थ्यांना उपयोगी ठरेल. मुद्रक प्रसन्न परांजपे, टंकलेखक सिद्धेश साठे व तेजस जोशी, देवेश कलंत्री, वांगमय गोडबोले,यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन व प्रस्तुती अनिकेत कुलकर्णी आणि निवेदिता मेहेंदळे यांची लाभली. या कार्यक्रमाचे खुमासदार सूत्रससंचालन व आभारप्रदर्शन सौ.तन्मयी मेहेंदळे-कुलकर्णी यांनी केले .यावेळी डॉ विद्या कुलकर्णी, कीर्तनकार ह भ प नंदकुमार मेहेंदळे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

