पुणे: कथक नृत्याविष्काराची अनुभूती देणाऱ्या, तसेच ताल, लय व भाव यांचा मोहक संगम असलेल्या ‘आवर्तन २०२५’ कार्यक्रमाचे पुण्यात आयोजन केले आहे. ‘लयोम इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्स अँड मीडिया’च्या येत्या मंगळवारी (दि. १९ ऑगस्ट २०२५) सायंकाळी ६.३० वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड पुणे येथे हा कार्यक्रम होणार आहे. १७० कथक नृत्यांगना मनमोहक नृत्याविष्कार सादर करणार आहेत, अशी माहिती प्रसिद्ध नृत्यांगना वेदांती भागवत महाडिक यांनी दिली.

या कार्यक्रमात वेदांती भागवत महाडिक यांच्यासह त्यांच्या शिष्यांकडून कथक नृत्यरचना सादर होणार आहेत. लयबद्ध पावले, ठेक्यांची नजाकत आणि भावनांच्या अभिव्यक्तीचा साज या कार्यक्रमात खुलणार आहे. कार्यक्रमात कथक गुरु पं. राजेंद्र गंगाणी यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभणार आहे. या नृत्यसंध्येला अभिजित पाटसकर (संवादिनी), सुनील अवचट (बासरी), मयूर महाजन (गायन), मुक्ता जोशी (नृत्य), यश सोमण (तबला) आणि अपूर्वा द्रविड (पखवाज) यांची साथसंगत लाभणार आहे.
“लयोम इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्स अँड मीडियाला यंदा १५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने ‘आवर्तन २०२५’ हा विशेष कार्यक्रम सादर होत आहे. कोथरूड, बाणेर, पाषाण, बालेवाडी या भागात असलेल्या संस्थेच्या शाखांमधील २०० विद्यार्थ्यांपैकी १७० विद्यार्थीनी नृत्य सादर करणार आहेत. त्यामध्ये शास्त्रीय बंदिशी, शिववंदना, गणेशवंदना, धृपद, चतुरंग, त्रिवट तराणा, ताल-तीनताल अशा शास्त्रीय कथक नृत्याचे अविष्कार रसिकांना पाहता येणार आहेत. मागील १५ वर्षात संस्थेतील चार मुलींना केंद्र सरकारची ‘सीसीआरटी’ शिष्यवृत्ती मिळाली आहे. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कथक स्पर्धांत मुलींना पारितोषिके मिळाली आहेत. ‘आवर्तन’सह लयोम इन्स्टिट्यूट’च्या रुक्मिणी स्वयंवर, बदलते चेहरे ह्या वैविध्यपूर्ण कथक कलाकृती संस्थेला लोकप्रिय करण्यात उपयुक्त ठरत आहेत,” असे वेदांती भागवत महाडिक यांनी नमूद केले.

