बाजीराव पेशवे, मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे यांच्या वेशभूषेत सहभागी होणार
थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान आणि इतिहास प्रेमी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
पुणे : थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान आणि इतिहास प्रेमी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३२५ व्या जयंती सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दिनांक १८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथून शोभा यात्रेला प्रारंभ होणार आहे, अशी माहिती थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे यांनी दिली.
अश्वारूढ आणि विविध वेशभूषेत युवक सहभागी होणार असून सामूहिक महाराष्ट्र गीत आणि संचलनातून होणार थोरल्या बाजीरावांना मानवंदना देणार आहेत.
सोमवार, दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता रमणबाग प्रशालेत इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांचे व्याख्यान होणार आहे. व्याख्यानानंतर रमणबाग ते शनिवारवाडा अशी भव्य शोभायात्रा काढण्यात येईल.
या शोभायात्रेत चौघडा वादनासह अश्वारूढ युवक विशेष आकर्षण ठरणार असून ते बाजीराव पेशवे, मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे यांच्या वेशभूषेत सहभागी होणार आहेत.
शनिवारवाडा येथे शोभायात्रेची सांगता होणार असून, तेथे उपस्थित सर्वजण महाराष्ट्र गीताचे सामूहिक गायन करतील. तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे विद्यार्थी संचलन करून थोरल्या बाजीरावांना मानवंदना अर्पण करतील. भव्य शोभायात्रेत पुण्यातील अनेक नामांकित शाळांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. त्यामध्ये रमणबाग प्रशाला, न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, न्यू इंग्लिश स्कूल (टिळक रोड), नु. म. वि., रेणुका स्वरूप, ज्ञानप्रबोधिनी (पुणे), ज्ञानप्रबोधिनी (निगडी), आर. सी. एम. गुजराती हायस्कूल, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा तसेच भाऊसाहेब हिरे हायस्कूल या शाळांचा समावेश आहे.

