‘शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे आयोजन : माता यशोदा सन्मान सोहळा
पुणे : गोविंदा रे गोपाळा…. गोविंदा आला रे आला… या पारंपरिक बँडवर वाजविलेल्या गाण्यांवर चिमुकल्यांचे पाय थिरकले आणि त्यांनी मोठया उत्साहात दहीहंडी फोडली. सोमवार पेठेतील दहीहंडीच्या उत्सवात संतुलन पाषाण शाळा या संस्थेतील दगडखाण कामगारांच्या मुलांनी सहभागी होत जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा केला.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी तर्फे कै.सौ.प्राची प्रकाश काळे स्मरणार्थ आपली दहीहंडी आणि माता यशोदा सन्मान सोहळ्याचे आयोजन सोमवार पेठेतील शाहिरी भवन गुरुकुल च्या आवारात करण्यात आले होते. यावेळी मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राध्या.लॉली दास यांच्या हस्ते सौ. सोनी दीपक जॉन या संतुलन पाषाण शाळेतील मावशींना माता यशोदा सन्मान देऊन गौरवही करण्यात आला. साडीचोळी, सन्मानपत्र असे सन्मानाचे स्वरूप होते. कार्यक्रमाला प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, प्राध्या.संगीता मावळे, कैलास देवकर , अरुणकुमार बाभुळगावकर, प्राध्या. रुपाली देशपांडे आदी उपस्थित होते.
संतुलन पाषाण शाळेतील मुलांना सुग्रास पुरणपोळी जेवण व संस्थेला धान्यरुपी गोपाळकाला मदत म्हणून देण्यात आला. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी व सृजनसभा या संस्थांच्या वतीने भगवान योगेश्वर कृष्णाच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून स्वर गोकुळ या संगीत सभेचे आयोजन केले होते. गोकुळाष्टमी म्हणजे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा जन्मोत्सव यावर्षी ७५०वा जन्मोत्सव व स्व. शिवभूषण निनादराव बेडेकर यांचाही जन्मदिवस. यावर्षी विशेष योग म्हणजे भारतीय स्वातंत्र्य दिन. स्वरगोकुळ या विशेष संगीत सभेत सौ. शुभदा देशपांडे व डॉ. महावीर बागवडे यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन झाले. यावेळी होनराज मावळे यांनी संवादिनीची व मंगेश करमरकर यांनी तबल्यावर साथ दिली.
दगडखाण कामगारांच्या मुलांनी फोडली ‘आपली दहिहंडी
Date:

