पुणे-केशव माधव विश्वस्त निधी तर्फे पुणे जिल्ह्यातील दहावी मध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उत्तुंग यश मिळविलेल्या तसेच नववी मध्ये यश संपादन करून दहावी मध्ये प्रवेश घेतलेल्या अशा एकूण ४० विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कर्वेनगर येथील”सरस्वती विद्या मंदिर”च्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र टाईम्सचे निवासी संपादक श्रीधर लोणी तर प्रमुख पाहुणे म्हणून विंग कमांडर अविनाश मुठाळ (निवृत्त) हे होते.पुणे जिल्ह्यातील विविध शाळांमधील एकूण चाळीस यशस्वी गुणवंत विद्यार्थांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.रोख बक्षीस प्रत्येकी एक हजार एक,प्रशस्तीपत्र,पुष्पगुच्छ व प्रेरणादायी पुस्तक देऊन विद्यार्थांना गौरविण्यात आले.सेवा सहयोग फाऊंडेशन तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांना स्कूल किट्स देण्यात आले.ह्या प्रसंगी केशव माधव चे विश्वस्त रवी जावळे,सचिव अरविंद देशपांडे,सरस्वती विद्यामंदिर च्या कार्यवाह संध्या डंबीर,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संभाजीभाग संघचालक अनिल व्यास यांची मुख्य उपस्थिती होती.
“विद्यार्थ्यांमधील सुप्तगुण ओळखून त्यांच्या क्षमतेचा विकास करण्याकडे कल असला पाहिजे.आजच्या स्पर्धात्मक युगात फक्त अभ्यासात हुशार असणे पुरेसे नसून यशस्वी होण्यासाठी मानसिकदृष्ट्या सशक्त असणे गरजेचे आहे.योग्य मार्गदर्शन, वेळेचे नियोजन,व भावनिक समतोल या तिन्ही गोष्टीचा समावेश त्यांच्या व्यक्तिमत्व विकासात झाला पाहिजे.”अशा शब्दात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विंग कमांडर (निवृत्त) अविनाश मुठाळ यांनी मार्गदर्शन केले.”गुणवंत विद्यार्थांनी आपल्या आई वडिलांनी घेतलेल्या कष्टांची जाणीव ठेवावी तसेच आपल्या गुणवत्तेचा राष्ट्राच्या प्रगतीसाठी उपयोग करावा व देशाला अभिमान वाटेल असे कार्य त्यांनी करावे”,अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र टाईम्सचे निवासी संपादक श्रीधर लोणी हे होते.अध्यक्षीय भाषणात श्रीधर लोणी म्हणाले,”प्रतिकूल परिस्थिती असूनही ह्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे अशा विद्यार्थांना राष्ट्रीय शैक्षणिक प्रवाहात आणणे आवश्यक आहे.केशव माधव सारख्या संस्था अश्या गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करीत आहे ही समाजाच्या दृष्टीने समाधानकारक गोष्ट आहे.राष्ट्राची व समाजाची प्रगती या पुढच्या पिढीवरच अवलंबून आहे.”
सुरवातीस रवी जावळे यांनी अविनाश मुठाळ व श्रीधर लोणी, यांचे तर अरविंद देशपांडे यांनी संध्या डंबीर व अनिल व्यास यांचे स्वागत केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रशांत कुलकर्णी यांनी केले.केशव माधव संस्थेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध समाजकार्याची माहिती अरविंद देशपांडे यांनी दिली.विश्वस्त प्रकाश देशपांडे यांनी आभार मानले.संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती निमित्त उन्नती वैद्य व संगीता कोरडे ह्यांनी पसायदान गायिले.उपस्थित विद्यार्थांना यावेळी खाऊचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास सरस्वती विद्यामंदिर चे अध्यक्ष राजेश भांडारकर,कार्यवाह संध्या डंबीर,मुख्याध्यापक उन्नती वैद्य तसेच ज्ञानदा प्रशाला व ग.रा. पालकर शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षक,विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

