पुणे : मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेचे तसेच २६व्या ख्रिस्ती मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पौलस वाघमारे यांचा षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा हृद्य वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रम पौलस वाघमारे फ्रेंड सर्कलतर्फे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात शुक्रवारी (दि. १५) आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह ॲड. प्रमोद आडकर यांच्या हस्ते पौलस वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला.
मागासवर्ग आयोगाचे माजी समन्वयक डॉ. मदन कोठुळे, मसाप उरळीकांचनचे अध्यक्ष लक्ष्मण घुगे, वडगाव शेरी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती गलांडे, नाट्य व चित्रपट दिग्दर्शक सूर्यकांत तिवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पौलस वाघमारे यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. पौलस वाघमारे लिखित ‘अव्यक्त सत्य’ या कथासंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, चांगुलपणा असणाऱ्या व्यक्तींपैकी एक असलेले पौलस वाघमारे हे सात्विक, सत्शील आणि निगर्वी व्यक्तीमत्व आहे. त्यांचे साहित्य क्षेत्रात मोठे योगदान आहे. चांगल्या माणसातीलही लक्षात राहणारी व्यक्ती म्हणजे पौलस वाघमारे होय.
सत्काराला उत्तर देताना पौलस वाघमारे यांनी ‘माझी आई’ ही स्वरचित कविता सादर केली.
लक्ष्मण घुगे म्हणाले, पौलस वाघमारे हे अक्षरांचे रान फुलविणारे लेखक आहेत. त्यांच्या साहित्यिक कलाकृती या सृजनात्मक विचारांची रचनात्मक मांडणी असणाऱ्या आहेत. त्यांच्या लिखाणाची भाषाशैली सहज सोपी असली तरी शब्दांचे रूप असामान्य आहे.
या प्रसंगी डॉ. मदन कोठुळे, मारुती गलांडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. मान्यवरांचे स्वागत अंतोनी मिस्किटा, अरुण कटारिया, आशा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली अवचरे यांनी केले.
पौलस वाघमारे यांचा षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त सत्कार
Date:

