मुंबई- महाराष्ट्रात दहीहंडीच्या उत्सवात दोघांच्या मृत्यूची घटना समोर आली आहे. मानखुर्दमध्ये दुर्देवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका गोविंदाचा मृत्यू झाला आहे. बाल गोविंदा पथकातील 32 वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाला आहे.तर गावदेवी गोविंदा पथकातील रोहन वाळवी या गोविंदाचा मृत्यू झाल्याचे येथे समजले आहे .महाराष्ट्रात दहीहंडीच्या विविध घटनांत १०० वर गोविंदा जखमी झाल्याचे वृत्त असून खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमात बाल बाल बचावल्याचे समजले आहे.
मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरमध्ये ही दुर्घटना घडली आहे. बाल गोविंदा पथक तिथे दाखल झालं होतं. 32 वर्षीय जगमोहन चौधरी याला दहीहंडीचा रोप बांधला जात होता. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. जगमोहन चौधरी दोर बांधत असताना खाली पडला आणि या दुर्दैवी घटनेत त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जगमोहनला तातडीने शताब्धी रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण तिथे डॉक्टरांनी त्याला तपासलं असता त्याचा मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आलं. यामुळे मानखुर्दमध्ये शोककळा पसरली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीच्या निमित्ताने नव्या मुंबईत विविध कार्यक्रमास हजेरी लावली होती. एकनाथ शिंदेंचा घनसोलीतील शेवटचा कार्यक्रम होता. कार्यक्रम संपल्यानंतर शिंदे स्टेजवरून खाली उतरत असताना अचानक स्टेज खचला. क्षमतेपेक्षा जास्त कार्यकर्ते जमा झाल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. या अनपेक्षित घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळ उडाला. मात्र, शिंदे यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी तातडीने त्यांना सावरले आणि सुरक्षितपणे घटनास्थळावरून बाहेर काढले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.रुग्णालयांनुसार आकडेवारी
सेंट्रल मुंबईतील रुग्णालयांत 51 जखमी गोविंदांना दाखल करण्यात आले. यापैकी 32 जणांवर उपचार सुरू आहेत. ग.टी. रुग्णालयात दाखल असलेला 23 वर्षीय श्रेयस चालके हा गंभीर जखमी असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 19 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.
ईस्टर्न सबर्बन रुग्णालयांत 31 जखमी गोविंदा दाखल झाले होते. यापैकी 5 जणांवर उपचार सुरू असून उर्वरित 26 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
वेस्टर्न सबर्बन रुग्णालयांत 34 जण दाखल झाले. यातील ३ जण उपचाराधीन आहेत. कांदिवली येथील बीडीबीए रुग्णालयात दाखल असलेला 9 वर्षीय आर्यन यादव गंभीर अवस्थेत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 31 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.मुंबईत आणखी एका गोविंदाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. हा गोविंदा गावदेवी गोविंदा पथकातील होता. रोहन वाळवी असे मृत्यू झालेल्या गोविंदाचे नाव आहे. रोहन अंधेरीतल्या दहीहंडीत सहभागी न होता एका टेम्पोत बसलेला असताना तो अचानक बेशुद्ध पडला, त्यानंतर त्याला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाला. याआधी मानखुर्द येथे एका गोविंदाचा दहीहंडी बांधताना मृत्यू झाला. हा तरुण गल्लीतल्या बालगोपाळांसाठी पहिल्या मजल्यावरून दहीहंडी बांधता होता. त्यावेळी अचानक तो खाली पडला.

