अनेकवेळा हॉटेलवर कारवाई पण मालकाला अभय ? संबंधित बॉलर पब विरोधात यापूर्वी देखील अनेकवेळा कारवाई झाल्या आहे परंतु हॉटेलचे मॅनेजर किंवा कर्मचारी यांचेवर तात्पुरती कारवाई केली जात असल्याचे दिसून आले आहे. राजकीय दबावामुळे हॉटेलचे मालकांवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात येत नाही. स्वातंत्र्य दिवसा निमित्ताने पुणे शहरात मद्य विक्रीवर पूर्णपणे प्रतिबंध असताना देखील कल्याणीनगर येथे हॉटेल बॉलर पब मध्ये सरसकट दारु विक्री करण्यात येत होती. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाल्यावर पोलिसांनी कारवाई केली.
पुणे-स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ड्राय डे असताना देखील पुण्यातील उच्चभ्रू भाग समजल्या जाणाऱ्या कल्याणीनगर भागात नामांकित बॉलर पब मध्ये मद्यविक्री चालू असल्याची माहिती पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मिळाली होती. त्यानुसार पोलीसांचे पथकाने बॉलर पब मध्ये रात्री एक वाजता छापा टाकून पाहणी केली असता, मद्य विक्री केली जात असल्याचे दिसून आल्याने पबवर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बॉलर पबचे मॅनेजर रेमंड फ्रान्सिस डिसोजा (वय- ४५,रा. शास्त्रीनगर, कोथरूड,पुणे) याच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी त्याचे ताब्यातील आस्थापना, हॉटेल ‘हॉटेल बॉलर’ हे सरकारने घालवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करुन विहित वेळेपेक्षा जास्त वेळ सुरु ठेवले.
हॉटेल मध्ये सुमारे ३०० ते ४०० ग्राहक यांना खाद्यपदार्थ, मद्य पेय आदी सुविधा पुरवत असल्याचे मिळून आल्याने याबाबत पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. येरवडा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात पोलीस शिपाई ज्ञानेश्वर बाळसराफ (वय- ४२) यांनी फिर्याद दाखल केली आहे. या घटनेवेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक जितेंद्र पाटील व पोलीस उपनिरीक्षक महेश फटांगरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम २९३, २२३ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

