पुणे-ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर विरोधकांकडून नेहमी दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडण्यावरुन राजकीय टीका केली जाते. पण त्यावेळी नेमकी राजकीय परिस्थिती काय होती? याबाबत शरद पवार यांनी आज सविस्तर खुलासा केला आहे.काँग्रेस नेते उल्हास पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात पुण्यातील उमेदीचा काळ, काँग्रेसमधील वाटचाल, उल्हास पवारांसारख्या समविचारी कार्यकर्त्यांसोबतचा काळ आणि आठवणींना उजाळा दिला. “काँग्रेसमध्ये आम्ही होतो तेव्हा काँग्रेस वेगळी झाली. निवडणूक झाली, कोणाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. त्यावेळेस काँग्रेसमध्ये एक राग असायचा. तेव्हा आम्ही ठरवलं. दादांचे सरकार घालवायचं आणि मी मुख्यमंत्री झालो. त्या 10 वर्षांनंतर आम्ही परत एकत्र आलो. पण मुख्यमंत्री कोणाला बनवायचं? याची चर्चा झाली. वसंत दादांनी सांगितलं की, आता चर्चा नाही. पक्ष सर्वांचा आहे, म्हणून याचं नेतृत्व शरदकडे द्यायचं, असं वसंत दादा त्या काळात म्हणाले होते”, असं शरद पवार यांनी सविस्तर सांगितलं.
शरद पवारांनी नेमका किस्सा काय सांगितला?
“यशवंतराव चव्हाण यांचं भाषण म्हटलं तर आम्हा लोकांनी ते कधीच सोडलं नाही. नीट विषयावर मंत्रमुग्ध व्हावं, अशा प्रकारचे विचार हे यशवंतराव चव्हाण मांडायचे. विनायकराव पाटील आज हयात नाहीयत. ते पक्षाचे अध्यक्ष होते. त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लोकांना असायचं. वसंतदादाचं देखील आम्हाला मार्गदर्शन असायचं. ही मोठी माणसं आहेत. या सगळ्या लोकांचं अंतकरण फार मोठं होतं. महाराष्ट्र ाच्या नेतृत्वाची फळी या ज्येष्ठ लोकांनी उभी केली आणि वर्षोनुवर्षे महाराष्ट्र एक देशाचं चांगलं राज्य होऊ शकला. त्याला राज्य चालवण्याची ताकद आणि दृष्टी असलेल्या नेतृत्वाची फळी या लोकांनी उभी केली. त्यामुळे महाराष्ट्राचा चेहरा बदललाय”, असं शरद पवार म्हणाले.”या लोकांचं मन किती मोठं होतं याचे अनेक उदाहरणं सांगता येतील. मला आठवतंय, काँग्रेसमध्ये ज्यावेळी होतो. काँग्रेस विभागली. इंदिरा काँग्रेस वेगळी झाली, एस काँग्रेस वेगळी झाली, आम्ही एस काँग्रेसमध्ये होतो. यशवंतराव चव्हाण होते. आणखी लोक होते आणि निवडणूक झाली. निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळालं नाही. काँग्रेसला काही जागा, आम्हाला काही जागा. शेवटी आम्ही एकत्र आलो आणि वसंतदादांना मुख्यमंत्री केलं”, असं शरद पवार म्हणाले आणि ते पुढे किस्सा सांगू लागले.”पण आमच्या तरुण लोकांचा त्यावेळेला काँग्रेसवर कायमच राग असायचा. आम्ही सगळे यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचे. त्यामुळे आमच्यात एक अंतर होतं. वसंतदादा हे आम्हा लोकांचे नेते. पण शेवटी त्यांनी हे दोघे एकत्र यावे यासाठी प्रयत्न केले आणि त्याला आम्हा लोकांचा विरोध होता. त्या विरोधामध्ये जे प्रमुख होते, त्यामध्ये मी होतो. परिणाम काय झाला, एक दिवशी ठरवलं, दादांचं सरकार घालवायचं. आणि दादांचं सरकार आम्ही लोकांनी घालवलं. आणि मी मुख्यमंत्री झालो. माझ्या हातात सत्ता आली”, असं शरद पवार यांनी सांगितलं.”सांगायचं कारण असं त्यानंतर 10 वर्षानंतर आम्ही परत एकत्र आलो. राज्याचा मुख्यमंत्री कोणाला करायचं याची बैठक होती. त्या बैठकीत अनेक लोक होते. वसंतदादांनी ही बैठक बोलावली. त्या बैठकीत अनेक नावांची चर्चा झाली. दादांनी सांगितलं, आता बाकी कुणाच्या नावाची चर्चा नाही. आज पुन्हा एकदा पक्ष सावरायचा आहे आणि पक्ष सावरायचा असेल तर पक्षाचं नेतृत्व शरदकडे द्यायचं हा निकाल त्यांनी दिला. ज्या व्यक्तीचं सरकार मी पाडलं ती व्यक्ती पुन्हा गांधी, नेहरुंचे विचार मजबूत करण्यासाठी मी काय केलं ही गोष्ट विसरुन मोठ्या अंतकरणाने पुन्हा एकत्र करण्याची भूमिका मानणारं असं हे नेतृत्व होतं”, अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली.

