पुणे-बीएसएनएलच्या इन्स्पेक्शन चेंबरमध्ये ऑप्टिकल फायबरचे काम करताना गुदमरून तीन कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना दुपारी निगडी प्राधिकरण सेक्टर क्रमांक २७, प्लॉट क्रमांक ६५ समोर रस्त्याच्या कडेला असलेल्या बीएसएनएलच्या चेंबरमध्ये घडली. दरम्यान यांच्यासोबत असलेला चौथा कामगार बालंबाल बचावला.दत्ता होलारे, लखन धावरे (दोघेही रा. गुरुद्वारा चौक, आकुर्डी) आणि साहेबराव गिरसेप (रा. बिजलीनगर) अशी मृत कामगारांची नावे आहेत. हे कामगार मूळचे धाराशिवचे राहणारे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसएनएल आकुर्डी कार्यालयातील तीन कंत्राटी कामगार नेहमीप्रमाणे रोजच्या कामावर गेले होते. चेंबरमधील कामानिमित्ताने ड्रेनेज मध्ये रावसाहेब सर्वात प्रथम उतरले. काही कळण्याआधीच मोठा आवाज झाला आणि ड्रेनज मध्ये साचलेल्या अतिशय दुर्गंधीयुक्त पाण्यात ते कोसळले. लखनने हे पाहिले तसा तोही खाली उतरला. रावसाहेबाला उचलण्यासाठी खाली वाकला आणि तोही कोसळला. हे पाहणाऱ्या दत्ताने एका क्षणाचाही वेळ न लावता ड्रेनज मध्ये उडी घेतली आणि तोही डोळे पांढरे करून आडवा झाला.
यांच्यासोबत आलेला चौथा कामगार चेंबर बाहेर उभा होता. ड्रेनेजमध्ये गॅस असल्याचे त्याच्या लक्षात आले. खाली उतरलेल्या तिघांना वाचवण्यासाठी त्यांनी आरडाओरडा सुरू केला. मात्र तोपर्यंत गुदमरून तिघांचाही मृत्यू झालेला होता अशी माहिती निगडी पोलिसांनी दिली.घटनेनंतर परिसरात क्षणात खळबळ उडाली. स्थानिकांनी कामगारांना बाहेर काढण्यासाठी जीव तोडून प्रयत्न केले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
दरम्यान, घराबाहेर कामाला गेलेली आपली माणसे आता परत येतील या आशेने वाट पाहणाऱ्या कुटुंबियांना, दुपारपर्यंत त्यांच्या निधनाची दुःखद बातमी कळवण्यात आली. कुणाच्या कपाळावरचे कुंकू पुसले, कुणाच्या डोक्यावरची सावली हिरावली, तर कुणाच्या हातातील कष्टकऱ्याची ऊब कायमची हरपली. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी तिन्ही घरांचे दिवे विझल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान तिघांच्या कुटुंबीयांना सायंकाळपर्यंत या घटनेची माहिती मिळालेली नव्हती. पोस्टमार्टम करण्यासाठी वाय सी एम रुग्णालयात मृतदेह आणण्यात आले. त्यावेळी तिघांचे कुटुंबीय तेथे आल्यानंतर एकच आक्रोश पाहायला मिळाला. हे कुटुंबीय धाराशिवचे आहे. रात्री उशिरा या तिघांचे मृतदेह कुटुंबीयांनी त्यांच्या मूळ गावी नेले.

