पुणे -पुण्यात साथी किशोर पवार जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित परिसंवादात शरद पवार यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले. राज्यातील सहकारी साखर कारखानदारीला धोका निर्माण झाला असून खासगी कारखान्यांची संख्या वाढत आहे. साखर कारखान्यांची क्षमता वाढत असली तरी कामगारांची संख्या मात्र झपाट्याने कमी होत आहे.
कारखानदारी आणि साखर कामगार टिकवण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येऊन चर्चा करण्याची आवश्यकता पवार यांनी व्यक्त केली. या प्रक्रियेत महाराष्ट्र सरकारलाही सहभागी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
साथी किशोर पवार प्रतिष्ठान आणि लोकमान्य सोसायटीतर्फे आयोजित या कार्यक्रमात माजी मंत्री बाळासाहेब थोरात, साखर कामगार प्रतिनिधी तात्यासाहेब काळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. पवार यांनी साथी किशोर पवार यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांचे स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन आणि कामगार चळवळीतील योगदान अधोरेखित केले.
देशातील साखर उद्योगाची सद्यस्थिती चिंताजनक असल्याचे पवार यांनी नमूद केले. कापड गिरण्यांप्रमाणेच साखर कारखान्यांमधील कामगारांची स्थिती बिकट होत चालली आहे. कामगार चळवळीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असून, कामगारांची पिळवणूक होत असेल तर संघर्ष अपरिहार्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आज सहकार क्षेत्रात खासगी कारखाने वाढत आहेत. तर सहकारी कारखाने कमी होत आहेत. पूर्वीही खासगी कारखाने होते. पण, ते महाराष्ट्रातल्या लोकांचे होते. कारखान्यात जो कामगार घाम गाळतो, तो टिकला पाहिजे. पण, सध्या उलटे चित्र बघायला मिळते. कारखान्यांची साईज वाढली. 20 हजार टन क्षमतेचे कारखाने झाले. पण, कामगारांची संख्या 150 ते 200 पर्यंत मर्यादित झाली. हे चिंताजनक आहे. म्हणूनच या प्रश्नावर एकत्र बसून चर्चा करावी लागेल. महाराष्ट्र सरकारला विश्वासात घेऊन यावर मार्ग काढावा लागेल, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.

