पुणे, १४ ऑगस्ट २०२५ – देशात लाखो रुग्णांना योग्य ते आवश्यक अवयव उपलब्ध नसल्याने जीव वाचविण्यासाठी अवयव प्रत्यारोपणाची प्रतीक्षा करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर सह्याद्रि हॉस्पिटल्सने ‘जिंदगी मिलेगी दोबारा’ हे मोहीम सुरू केली आहे. अवयवदानाबाबत सर्वसामान्यांत जागृती निर्माण करणे आणि नागरिकांना अवयवदानाची शपथ घेण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा या मोहिमेचा उद्देश आहे. भारतामध्ये मृत व्यक्तींच्या अवयवदानाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. देशात अवयवदानाचा दर दशलक्ष लोकसंख्येमागे १ पेक्षा कमी आहे. सन २०२४ मध्ये देशात सुमारे १८,९०० अवयवांचे प्रत्यारोपण झाले असून भारत जागतिक स्तरावर संख्येनुसार तिसऱ्या क्रमांकावर आहे. तरीही, दरवर्षी अंदाजे १.७५ लाख रुग्णांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाची गरज असते, तर यकृत, हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी प्रत्येकी सुमारे ५० हजार रुग्ण प्रतीक्षेत असतात. सह्याद्रि हॉस्पिटल्सचे हे अभियान दि. १३ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत, जागतिक अवयवदान दिनापासून सुरू होऊन, पुणे, नाशिक, कराड व अहिल्यानगर येथील सर्व सह्याद्रि हॉस्पिटल्समध्ये राबवले जाणार आहे. यात सोशल मीडियावरील व्हिडिओ, आवाहने, गैरसमज दूर करणारी माहिती यांचा प्रसार करण्यात येईल, तसेच प्रत्यक्ष लोकसंपर्क साधणाऱ्या उपक्रमांतून नागरिकांना अवयवदानाचा संकल्प करण्यासाठी प्रेरित केले जाईल. समाजातील एखाद्या नागरिकाला तुमच्यामुळे जीवनदान मिळू शकेल, असे आवाहन केले जाईल.
या आठवड्याच्या सुरुवातीला, सह्याद्रि हॉस्पिटल’मध्ये मेंदूमृत घोषित झालेल्या एका २१ वर्षीय दात्याने पुण्यातील पाच गंभीर आजारी रुग्णांचे जीव वाचवले. अपार धैर्य व करुणा दाखवत या दात्याच्या कुटुंबाने जीवनाची अमूल्य भेट देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यकृत, हृदय, फुफ्फुस व मूत्रपिंडाच्या गंभीर आणि जीवघेण्या आजारांनी ग्रस्त रुग्णांना प्रत्यारोपण मिळाले. एका छोट्या निर्णयाचा परिणाम किती विलक्षण असू शकतो आणि फक्त संबंधित रुग्णांनाच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबियांना व समाजालाही कसा दिलासा मिळू शकतो, हे अशा घटनांमधून दिसून येते. म्हणूनच अवयवदानाचा संकल्प हा सामाजिक जबाबदारीचा भाग म्हणून स्वीकारणे अत्यंत आवश्यक आहे.
या मोहिमेअंतर्गत नागरिक www.ZindagiMilegiDobara.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन संकल्प करू शकतात किंवा ‘सह्याद्री हॉस्पिटल’च्या विविध युनिट्स, कॉर्पोरेट ऑफिस, मेट्रो स्थानकांवरील अवयवदान केंद्रांमध्ये जाऊन संकल्प नोंदवू शकतात. इच्छुकांना या संपूर्ण प्रक्रियेत प्रशिक्षित स्वयंसेवक मार्गदर्शन करतील.
वेबसाइटद्वारे संकल्प करणे असो, QR कोड स्कॅन करणे असो किंवा प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभागी होणे असो, ही प्रत्येक कृती कोणाचे तरी प्राण वाचवू शकते. अवयवदानाचा संकल्प करून तुम्ही कोणाच्या तरी आयुष्यात नायक बनू शकता — आणि यंदा रुपेरी पडद्याचा नायक, बॉलीवूडचा आयकॉन अनिल कपूर यांना भेटण्याची संधीही मिळवू शकता!

आता संकल्प करा: www.ZindagiMilegiDobara.com
स्कॅन करा आणि संकल्प करा. कुणाच्या तरी जीवनात सुपरस्टार बना.

