स्वातंत्र्यदिन, श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि संत ज्ञानेश्वर महाराज ७५० व्या जयंतीनिमित्त प्रतिकृती व पुष्पसजावट
पुणे : श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या वतीने स्वातंत्र्यदिन, श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त मंदिरात योगेश्वर श्रीकृष्ण आणि ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिकृती व पुष्पसजावट करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या विशेष शासन निर्णयानुसार श्री दत्त मंदिरामध्ये सप्त शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५०) जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून तिरंगी सजावट देखील करण्यात आले आहे.
सजावटीचा शुभारंभ निकम दिंडी क्र. १६ चे अध्वर्यू निष्ठावंत ज्येष्ठ वारकरी, समाजभूषण ह.भ.प. शांताराम महाराज निम्हण यांचे हस्ते झाला. यावेळी नवी दिल्ली येथील सेंट्रल गांधी स्मारक निधीचे सचिव संजय सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती. ट्रस्टचे अध्यक्ष अॅड.शिवराज कदम जहागिरदार, कोषाध्यक्ष युवराज गाडवे आदी उपस्थित होते. ट्रस्ट तर्फे त्यांचा महावस्त्र आणि सन्मानचिन्ह देवून यथोचित सत्कार यावेळी करण्यात आला.
ट्रस्टचे अध्यक्ष अॅड.शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, योगेश्वर श्रीकृष्ण यांनी भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान सांगितले ते संत ज्ञानेश्वर महाराजांनी सर्वसामान्यांसाठो प्राकृत भाषांतर केले. ज्ञानेश्वरीचे गारुड केवळ वारकरी संप्रदायच नाही तर अवघ्या मानव संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. ह भ प शांताराम महाराज निम्हण यांनी आपल्या सुश्राव्य स्वरात ज्ञानेश्वर महाराजांची आरती केली. ही सजावट शनिवार, दि.१६ ऑगस्ट पर्यंत खुली असून भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

