मुंबई-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त मांसविक्री बंदीच्या निर्णयावरून राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. “मांसविक्री बंदीसारखे निर्णय घेण्याचा अधिकार सरकार किंवा महापालिकेला नाही,” असे सांगत राज यांनी हा लोकांच्या स्वातंत्र्यावर घाला असल्याचा आरोप केला. कबुतरखान्यांवरून सुरू असलेल्या वादावरही त्यांनी भाष्य केले, “हायकोर्टाच्या आदेशाचे पालन करणे सर्वांसाठी बंधनकारक आहे, धर्माच्या नावाखाली नियम मोडणे चुकीचे आहे.” राज्यात सरकार जाणीवपूर्वक समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) जोरदार तयारीला लागली आहे. आज, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये पार पडली. या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राज ठाकरे म्हणाले, मांसविक्री बंद करण्याचे अधिकार महापालिकेकडे नाहीत. कोण काय खावे आणि काय खाऊ नये हे ठरवणे सरकार किंवा पालिकेचे काम नाही. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच लोकांना खाण्याचे स्वातंत्र्य न देणे हा सरळ विरोधाभास आहे. स्वातंत्र्य म्हटल्यानंतर तुम्ही बंदी कशी आणू शकता? कोणाचे काय धर्म आणि सण आहेत, त्याप्रमाणे काय खावे आणि कुणी काय खाऊ नये, ही बाब सरकारने सांगू नये, असा घणाघात राज ठाकरे यांनी केला.
ते पुढे म्हणाले, याबाबतचा कायदा 1988 साली आणल्याचे मी ऐकले. कायदा कधीही आणला असला, तरी स्वातंत्र्यदिनी आपण लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेत आहोत. कोणत्याही सरकारने या गोष्टीचा विचार केला पाहिजे.
कबुतरखाना प्रकरणात धर्माच्या नावाखाली नियमभंग चुकीचा–लोढा राज्याचे मंत्री, एका समाजाचे नाहीत
राज ठाकरे यांनी कबुतरखान्यांवरून सुरू असलेल्या वादावरही भाष्य केले. हायकोर्टाचा स्पष्ट आदेश आहे आणि त्या आदेशानुसार सर्वांनी वागले पाहिजे. कबुतरांमुळे होणाऱ्या रोगांबद्दल डॉक्टरांनी सांगितले आहे. बंदी असतानाही जर धर्माच्या नावाखाली कबुतरांना खाद्य दिले जात असेल, तर ते अत्यंत चुकीचे आहे. पोलिसांनी त्यावर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा एकाचा आदर्श पाहून इतरही तसेच करतील. मग हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयाचा अर्थ काय? असे राज ठाकरे म्हणाले.जैन समाजाच्या आंदोलनावेळी पोलिसांनी तत्काळ कारवाई केली पाहिजे होती, असे सांगत ठाकरे म्हणाले, “लोढा यांच्यासारखे लोक या प्रकरणात मध्यस्थी करत आहेत. ते कुठल्या एका समाजाचे नाहीत, तर राज्याचे मंत्री आहेत. महाराष्ट्राचा आणि न्यायालयाचा सन्मान त्यांनी राखायला हवा.”
काल झालेल्या मराठी बांधवांच्या आंदोलनातील घटनांचा उल्लेख करत ठाकरे म्हणाले, “राज्यात नेमके काय सुरू आहे, हेच कळत नाही. सरकारला हवे तरी काय? निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार सर्व समाजांमध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे का? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. पहिले हिंदीचा विषय आणला, तिथे वातावरण पेटते का ते बघितले. त्यानंतर आता त्यांनी कबुतरांचा विषय आणला. इथून पुढे कोणते प्राणी आणतील ते माहीत नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी सरकारवर केली.
मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे मी 2016-2017 सालापासून बोलतोय. बाकीचे आत्ता बोलायला लागलेत, असे राज ठाकरे म्हणाले. मुंबई महानगरपालिकेतील मतदार याद्यांची पुनर्तपासणी झाली पाहिजे. आमची लोक ही मतदार याद्यांची तपासणी करत असल्याचे त्यांनी सांगितले.

