पुणे -धनकवडी भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी ३० लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. सहकारनगर पोलिसांनी अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.गेल्या वर्षी सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाला मोबाइलवर संदेश पाठवला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष त्यांनी दाखवले. सुरुवातीला ज्येष्ठांनी काही रक्कम गुंतवली. चोरट्यांनी त्यांना गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळाल्याचे भासवले.
या आमिषाला बळी पडून ज्येष्ठांनी दीड ते दोन महिन्यात वेळोवेळी ३० लाख ४५ हजार रुपये गुंतवले. त्यानंतर त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही. चोरट्यांचे मोबाइल क्रमांक बंद असल्याचे आढळून आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.दरम्यान, याच पद्धतीने विमानतळ परिसरात एका तरुणाची ११ लाखांची फसवणूक झाली आहे. ऑनलाइन टास्कच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी १० लाख ६७ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार आणि पोलीस निरीक्षक शरद शेळके दोन्ही प्रकरणांचा तपास करत आहेत.

