मुंबई-केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाण्यास नकार देणाऱ्या शंकराचार्यांवरच थेट टीका केली आहे. शंकराचार्य पंतप्रधान मोदी यांच्याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहत आहेत. त्यांनी आपल्या जीवनात हिंदू धर्मासाठी कोणते योगदान दिले हे सांगावे, असे ते म्हणालेत.
राम मंदिर एवढ्या वर्षांनंतर होत आहे, त्याचे कौतूक नाही. हा विषय आतापर्यंत कोणी घेतला नव्हता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, भाजपनी हा विषय हाती घेतला. शंकराचार्यांनी होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्याव्यात की त्यावर टीका करावी? शंकराचार्य हे आमच्या भाजपला व पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजकीय दृष्टीकोनातून पाहत आहेत, असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे पुढे बोलताना म्हणाले की, राम मंदिर राजकीय दृष्टीकोनातून होत नसून धार्मिक दृष्टिकोनातून होत आहे. राम आमचा दैवत आहे. त्यासाठी मंदिर उभारले जात आहे. शंकराचार्यांनी त्यांच्या जीवनातले हिंदू धर्मासाठी दिलेले योगदान सांगावे, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. 19 व्या जागतिक मराठी संमेलनाचे उद्घाटन आज येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले. अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारी रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी चार शंकराचार्यांनी नकार दिला आहे. यावर भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

