डॉ. दाभोळकर खुनाचे सूत्रधार अजूनही मोकाट:सीबीआयकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची अंनिसची मागणी
डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या खून खटल्यामध्ये वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांची जी सुटका झाली आहे, त्याविषयी सी.बी.आय.ने उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली नाही ही अक्षम्य दिरंगाई आहे. सी.बी.आय. ने तातडीने उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
पुणे-डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या निर्घृण खुनाला २० ऑगस्ट रोजी १२ वर्षे पूर्ण होत आहेत. याविषयी पुणे सत्र न्यायालयाने शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या दोघांना दोषी ठरवून शिक्षा दिलेली आहे. असे असले तरीही या खुनामागचे सुत्रधार अजूनही मोकाटच आहेत. त्यांना पकडण्याचे कुठलेही प्रयत्न शासनाच्या पातळीवर सुरु नाहीत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या सूत्रधारांना कधी पकडणार असा संतप्त सवाल हमीद दाभोलकर, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, श्रीपाल ललवाणी व अनिल वेल्हाळ यांनी अंनिसमार्फत पुणे येथील पत्रकार परिषदेमध्ये केला.राष्ट्रीय पातळीवर जादूटोणा विरोधी कायदा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
ते पुढे म्हणाले की ‘डॉ नरेंद्र दाभोळकरांचा खून हा त्यांचे विचार संपवण्यासाठी केलेला एक सुनियोजित कट होता’ असे निरीक्षण पुणे येथील सत्र न्यायालयाने नोंदवले असतानादेखील त्यामागचे सूत्रधार शोधण्यासाठी शासन काहीही प्रयत्न करत नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचे खूनखटले देखील अजून सुरु असल्याने या चारही खूनांमागील सुत्रधारावर कारवाई होऊ शकलेली नाही. जोपर्यंत हे सूत्रधार पकडले जात नाहीत तोपर्यंत विवेकवादी कार्यकर्त्यांना असलेला धोका कायम आहे, असेदेखील त्यांनी यावेळी नमूद केले.
डॉ नरेंद्र दाभोलकरांच्या स्मृतिदिनानिमित्ताने ऑल इंडिया पिपल सायन्स नेटवर्क यांच्या माध्यमातून देशभरात २० ऑगस्ट हा ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टीकोन दिवस’ म्हणून पाळला जातो. या वर्षी देखील त्या अंतर्गत देशातील पंधरा पेक्षा अधिक राज्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसार याविषयी कार्यक्रम केले जाणार आहेत.यावर्षी १७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजता डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृति व्याख्यानाचे आयोजन साने गुरुजी स्मारक पुणे येथे करण्यात आले आहे. या वेळी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक हे ‘भारताचे संविधान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन’ याविषयी व्याख्यान देतील. हेमंत गोखले, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील.

