‘स्वरमाऊली जयमाला’ ध्वनीचित्रफीतीद्वारे महोत्सवाचा शुभारंभ
पुणे : पद्मश्री जयमाला शिलेदार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मराठी रंगभूमि, पुणे आणि गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षभर विविध वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार असून याचा शुभारंभ गुरुवार, दि. 21 ऑगस्ट 2025 रोजी ‘स्वरमाऊली जयमाला’ या ध्वनीचित्रफीतीच्या उद्घाटनाने होणार आहे. शिलेदार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संगीत सौभद्र या नाटकाचा पाच तासांचा दीर्घ प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.
पद्मश्री जयमालाबाई शिलेदार यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात दि. 21 ऑगस्ट 2025 रोजी होत आहे. या निमित्ताने जयमालाबाई शिलेदार यांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या कार्यक्रमांबरोबरच संगीत रंगभूमीच्या उज्वल परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या कार्यक्रमांचे संपूर्ण वर्षभर आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जयमालाबाई शिलेदार यांच्या कन्या, मराठी रंगभूमि, पुणे आणि गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्टच्या अध्यक्षा दीप्ती शिलेदार-भोगले यांनी आज (दि. 13 ऑगस्ट) पत्रकार परिषदेत दिली. संस्थेच्या विश्वस्त वर्षा जोगळेकर, निनाद जाधव या प्रसंगी उपस्थित होते.
पद्मश्री जयमालाबाई शिलेदार या मराठी संगीत रंगभूमीचे वैभव आहेत. संगीत रंगभूमीची परंपरा जतन करणे आणि त्याच वेळी नाविन्याचा शोध घेत राहणे असा त्यांचा जीवनप्रवास आहे. अनेक वर्षे नायिकेच्या भूमिका साकारून आपल्या संगीताभिनयाने त्यांनी रसिकांच्या मनात मानाचे स्थान मिळविले. हे सगळे करीत असतानाच त्यांनी संगीत नाटकाचा वसा पुढील पिढीकडे पोहोचविण्यासाठी अमाप कष्ट घतले. जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने त्यांच्या चतुरस्र कारकीर्दीला वंदन करण्यासाठी वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभ दि. 21 ऑगस्ट 2025 रोजी ‘स्वरमाऊली जयमाला’ या ध्वनीचित्रफीतीच्या उद्घाटनाने होणार आहे. हा कार्यक्रम सायंकाळी 5:30 वाजता ज्योत्स्ना भोळे सभागृह, टिळक रोड येथे आयोजित करण्यात आला आहे. ध्वनीचित्रफीतीचे उद्घाटन ज्येष्ठ नाट्य-चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून डॉ. किरण ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. उद्घाटन समारंभ सर्वांसाठी खुला आहे.
रविवार, दि. 24 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 ते दुपारी 3 या वेळात बालगंधर्व रंगमंदिर येथे संगीत नाट्य रसिकांसाठी खास पर्वणी ठरेल असा संगीत सौभद्र या नाटकाचा दीर्घ प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. पाच तासांच्या या प्रयोगामध्ये नटी सूत्रधारापासून भरतवाक्यापर्यंतचा समावेश आहे. रंगमंदिराच्या दोन वेळा घेऊन हा नाट्यप्रयोग सादर होणार असून रसिकांना अल्पोपाहार ही देण्यात येणार आहे. वर्षभर होणारे सर्व कार्यक्रम नाममात्र दरात असणार आहेत.
संगीत नाटकाचे सौंदर्य वेगवेगळ्या पद्धतीने रसिकांना उलगडून दाखविण्यासाठी दर महिन्याला एक असे वर्षभर विविध सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘तो राजहंस एक’ हा अतुल खांडेकर यांचा बालगंधर्व यांच्या गानप्रतिभेला वंदन करणारा कार्यक्रम, ‘अष्टनायिका’ हा जयमालाबाईंनी साकारलेल्या संगीत नाटकातील काही प्रमुख नायिकांवर आधारित कार्यक्रम, ‘अंबरी जोवरी शशीरवि’ हा जयमालबाई, कीर्तीताई, नीलकंठबुवा अभ्यंकर यांनी संगीत दिलेल्या नाट्यसंगीत आणि भजनांचा कार्यक्रम, ‘नाट्यसौरभ’ हा संगीत नाटकातील रंगतदार नाट्यप्रवेशांचा कार्यक्रम, ‘तालबंधातली ठेव ही’ हा नाट्यसंगीतातील तालवैविध्याचे सप्रयोग सादरीकरण, ‘स्वरवंदना’ हा संगीत नाटकातील तीन बुजूर्ग संगीतकारांच्या स्वररचनांवर आधारित कार्यक्रम, ‘रंगभाषा’ हा संगीत नाटकातील मराठी भाषेचं सौंदर्य दाखवणाऱ्या नाट्य प्रवेशांचा कार्यक्रम, ‘नाट्यसंगीतातील लोकधारा’ हा संगीत नाटकांमधून लोकसंगीताचा झालेला आकर्षक वापर यावर आधारित कार्यक्रम, संगीत नाटकाचे अभिवाचन, ‘पदरचना विस्मयकारा’ हा संगीत मानापमान नाटकातील विस्मयकारी शब्द-स्वररचनांद्वारे होत असलेले भाव प्रकटीकरण दर्शविणारा कार्यक्रम, वेगवेगळ्या संगीत नाटकात आलेले नटी सूत्रधार प्रवेश यावर आधारित कार्यक्रम… असे विविध कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.
युवा पिढीला संगीत नाटकांचा आनंद कळावा, या कलाप्रकाराचं वैशिष्ट्य जाणवावं हाच जयमालाबाई शिलेदार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमांचा मुख्य उद्देश आहे.
पद्मश्री जयमाला शिलेदार जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांगीतिक कार्यक्रम
Date:

