पुणे, दि. १३ : आंतरराष्ट्रीय शालेय खेळ महासंघाद्वारे शांग्लुओ, चीन येथे ४ ते १३ डिसेंबर २०२५ या कालावधीत 15 वर्षाखालील मुला-मुलींकरीता जागतिक शालेय व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाची निवड करण्यासाठी भारतीय शालेय खेळ महासंघाने २५ ते ३० ऑगस्ट २०२५ दरम्यान राष्ट्रीय निवड चाचणीचे आयोजन केले असून ऑगस्ट २०२५ च्या तिसऱ्या आठवड्यात श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथे राज्यस्तरीय निवड चाचणीचे आयोजन केले आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
राज्य निवड चाचणीपूर्वी १४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८ वाजता चंद्रशेखर आगाशे शारिरीक शिक्षण महाविद्यालय, गुलटेकडी येथे विभागीय निवड चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे. या निवड चाचणीद्वारे पुणे विभागातून ५ मुले व ५ मुलींची राज्यस्तरीय निवड चाचणीसाठी निवड करण्यात येणार आहे. यासाठी खेळाडूचा जन्म १ जानेवारी २०१० ते ३१ डिसेंबर २०१३ या दरम्यान झालेला असावा. निवड चाचणीत सहभागी खेळाडूंच्या भोजन व निवासाची व्यवस्था त्यांनी स्वत: अथवा त्यांच्या शाळेने करावी.
निवड चाचणीच्या कागदपत्रांमध्ये खेळाडूंनी शासकीय विभागाने वितरित केलेला इंग्रजीमधील मूळ जन्मदाखला सादर करणे अनिवार्य आहे. खेळाडूंनी राष्ट्रीय शालेय स्पर्धेत सहभागासाठीचा पात्रता नमुना मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीसह सादर करावा. खेळाडूंकडे राष्ट्रीय चाचणीवेळी किमान ६ महिन्याची वैधता शिल्लक असलेले भारतीय पारपत्र (पासपोर्ट) असणे अनिवार्य राहील. खेळाडूकडे पारपत्र नसल्यास विभागीय निवड चाचणीवेळी संबंधित विभागाकडे पारपत्र तात्काळ मिळण्याकरिता अर्ज केल्याचा पुरावा सादर करणे अनिवार्य असेल.
व्हॉलीबॉल खेळाडूंनी अधिक माहितीसाठी क्रीडा मार्गदर्शक शिवाजी कोळी (७०२०३३०४८८), सुरेश काकड (८८८८८०६१५८), क्रीडा अधिकारी दादासाहेब देवकते (९९२३९०२७७७), अश्विनी हत्तरगे (७३८७८८०४२७) या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन श्री. लकडे यांनी केले आहे.
०००००

