आचार्य अत्रे मराठीचे सर्वाधिक लोकप्रिय नाटककार होते. ते लंडनला डी.एड. करायला गेले आणि फार्सिकल कॉमेडीचे मर्म आत्मसात करून आले. त्यांची विनोदी नाटके सर्वांना आवडत. अ. ए. सोसायटी हायस्कूलमध्ये असताना आम्ही ‘पाणिग‘हण’ हे नाटक केले. दुसर्यावेळी पुन्हा अत्र्यांचे ’वंदेभारतम्’ हे नाटक केले. हौशी कलावंतांना अत्र्यांची नाटके करणे सहज शक्य होते. त्यांचे ’लग्नाची बेडी’ हे नाटक तर हौशी नाट्यसंस्थांनी डोक्यावर घेतले. ’घराबाहेर’ हेही नाटक खूप चालले…
अत्रे आपल्या विनोदी भाषणाबद्दल प्रसिद्ध होते पण त्यांची भाषणे अत्यंत भावपूर्ण असत. मी त्यांच्या लिखाणाचा वेडा होतो. त्यांचे प्रत्येक पुस्तक मी वाचून काढले. अगदी एकलव्यासारखे मी त्यांना गुरुस्थानी मानले होते.
नगर महाविद्यालयाचे निमंत्रण
आचार्य अत्रे यांना अहमदनगर महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळातर्फे उद्घाटनाचे निमंत्रण पाठवण्यात आले. ते पुण्याहून नगरला कारने येणार होते. दुपारी निघून तीन वाजेपर्यंत नगरच्या रेल्वे गेट जवळून त्यांना घेऊन येण्यासाठी मी स्टेशनवर गेलो… ठरल्याप्रमाणे त्यांची निळी अॅम्बॉसिडर गाडी रेल्वे फाटकाजवळ आली. ती थांबवून मी त्यांना नमस्कार केला. मागच्या सीटवर अत्रे एकटेच संपूर्ण पडले होते. त्यांच्या पायाजवळ सीटखाली एक मोठी रमची बाटली आडवी पडली होती… त्यांनी पांढरी अर्धी चड्डी आणि पांढरा बनियान घातला होता. डोक्यावर गोल कॅप होती. ‘चला, प्रथम भालेराव साहेबांकडे जाऊ… नंतर कॉलेजवर…’ मी म्हटले. खरं म्हणजे अत्र्यांचा तो ‘अवतार’ पाहून मी मनातून फार घाबरून गेलो होतो.
नगर एस.टी.स्टँडसमोर हाजी इब‘ाहिम बिल्डिंग आहे. त्यात इंपिरीयल हॉटेलशेजारी असलेल्या एका फ्लॅटमध्ये अॅड. भालेराव राहात. त्यांनी अत्र्यांचे स्वागत केले. भालेराव अत्रेंना म्हणाले, ’हा रतन सोनग‘ा…‘, ‘अरे, मला मुलाची ओळख करून देता? मला माहित आहे.’ त्यांनी म्हटले…
’आम्ही तासाभराने परत येतो…’ असे सांगून टी बार्नबस यांच्या फ्लायमाऊथ गाडीने आम्ही कॉलेजात गेलो. आचार्य अत्रे येणार म्हणून सगळ्या कॉलेजमध्ये आनंदाचे वातावरण होते. त्यांच्या भाषणाला नागरिकांची गर्दी होणार म्हणून हा कार्यक्रम जिमखान्याच्या स्टेजवर घेण्यात आला होता. समोर विस्तृत मैदानावर खुर्च्या आणि सतरंज्या टाकल्या होत्या. नियोजित वेळी डॉ. रानडे, यांच्यासोबत आचार्य अत्रे आले. आमचे मराठी विभाग प्रमुख डॉ. शां. पां. बंडेलू, प्राचार्य बार्नवस आणि मी बसलो होतो. मी प्रास्ताविक केले. डॉ. शां. पां. बंडेलूनी स्वागत केले. समोरचे मैदान विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी फुलून गेले होते. दुपारी पाहिलेले अत्रे आणि आता दिसणारे अत्रे यामध्ये खूपच फरक होता. मॅनिला आणि फुल पँटमध्ये अत्रे विलक्षण रुबाबदार दिसत होते.
सभ्य स्त्री पुरुष हो!
अशी सुरवात करून त्यांनी आपल्या भाषणाला सुरवात केली. समोर पटांगणावर विशाल जनसमुदाय होता. कॉलेजचा विद्यार्थी वर्ग पुढे बसलेला होता. ’आज मी मराठी साहित्य मंडळाचे उद्घाटन करायला आलो.’ लोकांनी प्रत्येक वाक्याबरोबर हंशा आणि टाळ्या द्यायला सुरवात केली होती. अत्र्यांची कीर्तीच अशी होती की, हा ‘जाम हसवणारा माणूस’ आहे अशी समजूत होती. काहीही बोलले तरी ते लोक खुशीत असत. ते पुढे म्हणाले, माझी मराठी भाषा ज्ञानेश्वर, तुकोबाची आहे… ती जशी ‘अमृताशी पैजा जिंकणारी’ आहे तशी नाठाळाचे माथी काठी हाणणारी आहे. मराठी माणसाची व्याख्या करायला गेलो तर ज्याला ज्ञानेश्वरांची एक ओवी तुकारामांचा एक अभंग माहित आहे तो मराठी माणूस प्रत्येक मराठी माणसाला हे समजते.
आमचे मराठी साहित्य संतांच्या वाणीने समृद्ध आहे. आमचे काव्य केशवसुत, गडकरी, माधव ज्यूलियन, यशवंत यांंनी आपल्या कवितांनी नटवले आहे. पण सध्या नवकाव्याचा उदय झाला आहे. कोण तो कवी मर्ढेकर कसली कविता लिहितो.
‘पिपात मेले ओल्या उंदिर
मुरगळलेल्या मानविण…’
शी:ऽऽ पिपात उंदीर कसे मेले? त्यांच्या माना कुणी मुरगळल्या? ह्याच उंदरावर बसून नवकाव्याचा प्लेग महाराष्ट्रात आला ! (प्रचंड हंशा…)
साहित्यात एक वाद नेहमी चालू असतो. ‘कलेसाठी कला की जीवनासाठी कला…’ आमचे ना. सि. फडके म्हणतात, ‘कला ही कलेसाठी असते… तिचा जीवनाशी संबंध नसतो…’ आम्ही म्हणतो, ‘कला ही कलेसाठी तर कपडे हे कपड्यांसाठी काय? आम्ही या फडक्याच्या चिंध्या करून टाकल्या! हे नाक शिंकरण्याचे फडके असेच साहित्यात लुडबुड करते!’
साहित्य म्हणजे जे माणसाला सहित घेऊन जाते ते साहित्य. आचार्य विनोबांनी साहित्याची चांगली व्या‘या केली आहे. साने गुरुजी हे थोर साहित्यिक. त्यांचे सर्व साहित्य मराठी माणसाला जीवनाचे मांगल्य शिकवले… जीवनात जे जे पवित्र आणि मंगल आहे ते मराठी साहित्य आहे.
पंचतंत्र… इसापनीती च्या कथा माणसाला महत्त्वाची शिकवण देतात. सगळ्या प्राण्यात माणूस हा प्राणी हुशार आहे… पण काही माणसे स्वार्थात इतकी बरबटली असतात की त्यांना इतरांच्या दु:खाचे भान नसते. गरीबा बद्दल जिव्हाळा नसतो. निसर्गाबद्दल प्रेम नसते… महान लोकांविषयी आदर नसतो.
शेवट करताना आचार्य अत्रे म्हणाले, ‘मी मेल्यावर माझ्या समाधीवर पुढील वाक्य लिहा… ’हा माणूस मूर्ख होता पण कृतघ्न नव्हता!’ टाळ्यांचा प्रचंड कडकटात ही सभा संध्याकाळी संपली…
लेखक: प्रा. रतनलाल सोनग्रा

